गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील तपासावरुन मुंबई हायकोर्टाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फटकारले आहे. मुख्यमंत्री आहात की एका पक्षाचे नेते, विविध खाती सांभाळताना कार्यक्षमताही दाखवा, असे खडे बोल हायकोर्टाने सुनावले आहे.

दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यानंतर गोविंद पानसरे यांची देखील हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी दोन्ही कुटुंबीयांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांवर गुरुवारी मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. कुटुंबीयांच्या मागणीनुसार दोन्ही प्रकरणांचा तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली होत आहे.

गुरुवारी झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने तपासाच्या गतीवरुन गृहखात्याची जबाबदारी असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील फटकारले. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे.

यापूर्वी १४ मार्च रोजी झालेल्या सुनावणीत देखील हायकोर्टाने सरकारला झापले होते. कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासाला होणारा विलंब आणि मारेकऱ्यांना शोधण्याच्या तपास यंत्रणांच्या पद्धती हे चेष्टेचे विषय झाले आहेत. त्यामुळे राज्याचे हसे होत आहे, असे ताशेरे ओढून तपासाच्या विलंबाबाबत राज्याच्या अतिरिक्त मुख्य गृहसचिवांनी न्यायालयात येऊन स्पष्टीकरण द्यावे, असे हायकोर्टाने सुनावणीदरम्यान म्हटले होते.