ज्येष्ठ कामगार नेते कॉ.गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी समीर गायकवाडला शुक्रवारी न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर करण्यात आला. २५ हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर समीरला जामीन देण्यात आला आहे. मात्र, न्यायालयाने जामीन मंजूर करताना समीर गायकवाडला काही अटी घातल्या आहेत. त्यानुसार समीरला त्याचा पासपोर्ट न्यायालयाकडे जमा करावा लागणार आहे. तसेच जामीनकाळात त्याला निवासी पत्ता पोलिसांना कळवणे बंधनकारक असून तो महाराष्ट्राबाहेरही जाऊ शकणार नाही. तसेच त्याला कोल्हापुरात येण्यासही बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय, समीरला दर रविवारी ११ ते २ या वेळेत विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. गेल्या दीड वर्षापासून समीर पोलिसांच्या ताब्यात होता. मात्र, आता समीर गायकवाडला जामीन मंजूर झाल्याने या प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. गोव्यातील ‘सनातन संस्थे’चा साधक असलेल्या समीर गायकवाडला पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सप्टेंबर २०१५ साली अटक करण्यात आली होती. तेव्हापासून त्याची सतत चौकशी सुरू होती. या काळात त्यानं अनेकदा जामिनासाठी अर्जही केला होता.
समीर गायकवाड याला जामीन मिळावा यासाठी गायकवाडच्या वकिलांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. याची स्वतंत्र सुनावणी सुरू होती. मात्र, काल सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी समीरला जामीन देण्याला विरोध केला होता. समीर गायकवाड याला जामीन दिला तर तो इतर सनातन संस्थेच्या आरोपींसारखा फरार होण्याची शक्यता आहे. गंभीर गुन्ह्णााचे आरोप असलेले सनातन साधक फरार असल्याचा दाखला त्यांनी या वेळी दिला. तसेच समीर तुरूंगातून बाहेर आल्यास साक्षीदारांवर दबाव आणला जाईल, असे म्हणत सरकारी वकिलांनी गायकवाडचा जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी केली. यापूर्वीही अ‍ॅड. पुनाळेकर यांनी या प्रकरणातील साक्षीदारावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल आहे. त्यामुळे समीर गायकवाड याला जामीन देणे योग्य होणार नाही, असे निंबाळकर यांनी न्यायालयासमोर स्पष्ट केले. मात्र, न्यायालयाने समीरचे वकील समीर पटवर्धन आणि वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा युक्तिवाद ग्राह्य मानत आज समीरला जामीन मंजूर केला. दरम्यान, कालच या प्रकरणी न्यायालयात सरकारी पक्षाकडून एक नवा खुलास करण्यात आला होता. गोविंद पानसरे यांच्या खुनावेळी घटनास्थळी दोघे नाहीत, तर चौघे जण असल्याचा दावा सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी केला होता.