कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) आज, मंगळवारी सनातन संस्थेचा साधक वीरेंद्र तावडे याच्यावर आरोपपत्र दाखल केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कॉ. पानसरे यांच्या पत्नी उमा यांच्या जबाबावरून एसआयटीने सनातन संस्थेच्या दोन साधकांना ताब्यात घेतले होते.

कॉ. पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर त्यांच्या घराजवळच १६ फेब्रुवारी २०१५ रोजी मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला होता. हल्ल्याच्या चार दिवसांनंतर पानसरे यांचे उपचारादरम्यान मुंबई येथे निधन झाले होते. कॉ. पानसरे यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या विशेष पथकाने २ सप्टेंबरला संशयित वीरेंद्र तावडे याला सीबीआयकडून ताब्यात घेतले होते. तावडे याचे कोल्हापूरमधील प्रदीर्घ वास्तव्य, ईमेलवरून झालेला संशयास्पद पत्रव्यवहार, मोबाईलवरील संभाषण आणि साक्षीदाराने दिलेल्या माहितीनुसार, एसआयटीने तावडे याला अटक केली होती. या अटकेनंतर तावडे याच्या पनवेल येथील घर आणि सनातन संस्थेच्या आश्रमाचीही झडती घेऊन काही संशयास्पद वस्तू ताब्यात घेतल्या होत्या. त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. कॉ. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल होणारा तावडे हा समीर गायकवाड याच्यानंतर दुसरा संशयित आरोपी आहे.