पाचव्या संशयित आरोपीस अटक कोल्हापूर : ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पाचवा संशयित आरोपी अमोल अरविंद काळे ( रा. माणिक कॉलनी, पिंपरी -चिंचवड, पुणे) याला गुरुवारी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने २२ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. यापूर्वी संशयित काळे हा गौरी लंकेश हत्या प्रकरणात बेंगलोर येथे न्यायालयीन कोठडीत होता. १६ फेब्रुवारी, २०१५ रोजी भाकपचे नेते व ज्येष्ठ विचारवंत कॉ. गोविंद पानसरे व त्यांची पत्नी उमा पानसरे यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी गोळ्या झाडल्या, यामध्ये कॉ. पानसरे यांचा मृत्यू झाला. कॉ. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी कोल्हापूर एसआयटी पथकाने २०१६ मध्ये समीर विष्णुपंत गायकवाड (वय ३५, रा. सांगली) यास अटक केली. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमध्ये डॉ. वीरेंद्रसिंह शरदचंद्र तावडे त्याला अटक करण्यात आली होती. त्या तपासादरम्यान तावडे याचे पानसरे यांच्या हत्येमध्येही सहभाग असल्याने त्याला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली होती. या दोघांच्या चौकशीत विनय बाबुराव पवार (रा. उब्रज, ता.कराड) व सारंग दिलीप अकोळकर (रा. शनिवार पेठ, पुणे) यांची नावे समजली. मात्र हे दोघेही गुन्हा घडल्यापासून फरारी आहेत. दरम्यान, कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या कर्नाटक एसआयटी पथकाने अमोल काळे या संशयितास पुण्यातून अटक केली. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीनुसार पानसरे व दाभोलकर यांच्या हत्येत जे हत्यार वापरले होते, तेच पिस्तुल लंकेश हत्येत वापरले आहे. यावरून पानसरे व दाभोलकर यांच्या हत्येत काळेचा सहभाग असल्याचे तपासात पुढे आले. काळे हा २०१४—१५ मध्ये कोल्हापुरात वास्तव्याला होता. कॉ. पानसरे यांच्याविषयी सविस्तर माहिती त्याने मिळवली होती. पानसरेंच्या कार्यक्रमात त्याने विरोध केला होता. कोल्हापुरात त्याचे अनेक सहकारी आहेत. ही माहिती उघड झाल्यामुळे कोल्हापूर पोलीस काळे याचा ताबा घेण्यासाठी कर्नाटक पोलिसांच्या संपर्कात होते. महाराष्ट्र एसआयटीने बुधवारी सायंकाळी कर्नाटकात न्यायालयीन कोठडीत असलेल्या अमोल काळेला ताब्यात घेतले. त्यानंतर गुरुवारी त्यांना कोल्हापुरात आणून सकाळी सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एस. एस. राऊ ळ यांच्यासमोर हजर केले. प्रारंभी विशेष सरकारी वकील अॅड. शिवाजीराव राणे, तपासी अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे व संशयित आरोपीचे वकील अॅड. समीर पटवर्धन यांनी युक्तिवाद मांडला. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेऊन न्यायालयाने अमोल काळेला २२ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. त्यानंतर चोख बंदोबस्तात बुरखा घालून काळेला न्यायालयातून बाहेर काढले.