आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात समाजात वाचनाचे महत्त्व कमी होऊ नये व वाचन संस्कृतीची जोपासना व्हावी याकरिता शासन प्रयत्नशील आहे. त्या अनुषंगाने या वर्षीपासून माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याचा शासनाने निर्णय घेतला असून समाजात वाचन संस्कृतीला चालना मिळावी यासाठी हा एक अभिनव उपक्रम आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या वतीने वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित ग्रंथप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी राज्य ग्रंथालय परिषद सदस्य जान्हवी सावंत व राजन पोकळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, जिल्हा नियोजन अधिकारी हरिबा थोरात, जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम व ग्रंथालय शास्त्रज्ञ डॉ. एस. आर. रंगनाथान यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
जिल्हाधिकारी अनिल भंडारी म्हणाले; आजकाल आपण पुस्तक वाचनाला म्हणावा तसा वेळ देत नाही. उपलब्ध वेळ आपण मोबाइल, व्हॉट्स अ‍ॅप यांसारख्या आधुनिक संवाद तंत्रज्ञानावर खर्ची घालतो. पूर्वी वाचनामुळे लोक आपापसात चर्चा करत असत. त्यामुळे समाजाच्या वैचारिक जडणघडणीला विधायक चालना मिळत असे. आजच्या आधुनिक युगात या गोष्टीचा अभाव दिसून येतो. केवळ सिमेंट काँक्रीटचे रस्ते म्हणजे विकास नव्हे तर समाजाचा वैचारिक विकास होण्याकरिता समाजात वाचन संस्कृतीची जोपासना होणेही तितकेच महत्त्वाचे आहे, हे सांगताना जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी यांची ‘किताबें झांकती है बंद आलमारी के शिशों से’ ही कवी गुलजार यांची प्रसिद्ध कविता उपस्थित श्रोत्यांना ऐकविली.
जान्हवी सावंत म्हणाल्या; अन्न, वस्त्र व निवारा या जशा मानवाच्या मूलभूत गरजा आहेत त्याचप्रमाणे वाचन हीदेखील मानवाची चौथी मूलभूत गरज आहे. वाचनामुळे व्यक्ती प्रगल्भ व समृद्ध होते. तसेच व्यक्तीला जीवनात चुका टाळण्याची सवय लागते. विशेषत: स्त्रियांनी आपल्या वाचनाकडे विशेष लक्ष द्यायला हवे, ते वाढवायला हवे असे आवाहन ही जान्हवी सावंत यांनी या वेळी बोलताना केले.
अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर म्हणाले; गरीब व प्रतिकूल कुटुंबात जन्म घेऊनही डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे केवळ वाचनामुळे जीवनात यशस्वी झाले. वाचनामुळे माणूस घडतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. ए.पी.जे. कलाम ही याचीच उदाहरणे म्हणावी लागतील. मानव प्राणी हा आयुष्यभर शिकत असतो. ज्ञान मिळविणे हे मानवाची मूलभूत गरज आहे आणि ते मिळविण्यासाठी ग्रंथ, पुस्तके ही महत्त्वाची साधने आहेत. त्यामुळे स्वत:च्या व समाजाच्या विकासासाठी आपण वाचन वाढविले पाहिजे. त्याचबरोबर समाजमानस प्रगल्भ होण्यासाठी समाजामध्ये प्रयत्नपूर्वक वाचन संस्कृती रुजविली पाहिजे. तिची जोपासना केली पाहिजे. याप्रसंगी, राजन पोकळे व मयूरेश या शालेय विद्यार्थ्यांने आपले वाचनाविषयाचे आपले मनोगत व्यक्त केले.
कविसंमेलनाचे आयोजन –
या प्रसंगी कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दादा मडकईकर, प्रभाकर सावंत, रुजारियो िपटो, विनायक जोशी, सतीश साळगावकर, मधुरा आठल्ये, सुधाकर भिडे, कमलेश गोसावी, टी.के. कुबल, अजिंक्य जाधव, भानुदास तळगावकर, रोहिणी राजपूत आदी कवी व कवियत्री यांनी सहभाग घेतला. तसेच वाफा खान, दिनेश अहिर, मनाली कुठाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले व सूत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत यांनी केले तर आभार साहाय्यक माहिती अधिकारी संध्या गरवारे यांनी मानले.

peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था – मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये
study of psychology, digital campaigning in elections
निवडणुकांतील डिजिटल प्रचारतंत्रामागे मानसशास्त्राचा अभ्यास