अण्‍णा भाऊ साठे यांच्‍या जन्‍मशताब्‍दी वर्षानिमित्‍त जो १०० कोटी रूपयांचा निधी अर्थसंकल्पात जाहीर करण्‍यात आला आहे, तो राज्‍य सरकारने त्‍वरीत वितरीत करावा, अशी मागणी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. लोकशाहीर अण्‍णा भाऊ साठे यांच्‍या स्मृतीदिनानिमित्त (१८ जुलै) वेबेक्‍सद्वारे आयोजित कार्यक्रमात मुनगंटीवार बोलत होते. भाजपाचे महाराष्‍ट्र प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी या आदरांजली सभेचे आयोजन केले होते.

यावेळी मुनगंटीवार म्‍हणाले, “लोकशाहीर अण्‍णा भाऊ साठे यांच्‍या जन्‍मशताब्‍दी वर्षानिमित्‍त १०० कोटी रूपयांचा निधी मी अर्थमंत्री असताना जाहीर केला होता. त्‍याचप्रमाणे अण्‍णा भाऊंच्‍या प्रेरणादायी स्‍मृती जपण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून टपाल तिकीटाचे प्रकाशनही आम्‍ही केले होते. हा १०० कोटी रुपयांचा निधी त्वरीत वितरीत करावा.”

वंचित, शोषितांच्‍या कल्‍याणासाठी आपले अवघे आयुष्‍य खर्ची घालणाऱ्या अण्‍णा भाऊंचा यशोचित सन्‍मान व्‍हावा यासाठी मी प्रयत्‍नांची शर्थ करेन. अण्‍णा भाऊंना भारतरत्‍न या उपाधीने सन्‍मानित करावे, अण्‍णा भाऊंचे स्‍मारक, क्रांतीवीर लहूजी साळवे यांचे स्‍मारक आदी मागण्‍यांचा मी लोकप्रतिनिधी म्‍हणून पाठपुरावा करेन, असेही मुनगंटीवार पुढे म्हणाले.

२००१ मध्‍ये मातंग समाजाच्‍या विविध मागण्‍यांसाठी मुंबईच्‍या आझाद मैदानात आंदोलन सुरू होते. आमदार म्हणून मी त्‍या ठिकाणी भेट दिली होती. मातंग समाजाच्‍या विविध मागण्यांबाबत मी विधानसभेत अर्धा तास चर्चा उपस्थित केली. माझ्या मागणीच्‍या अनुषंगाने क्रांतीवीर लहूजी साळवे मातंग समाज आयोगाची स्‍थापना सरकारने केली. आयोगाने सरकारला मागण्‍यांबाबत काही शिफारशी केल्‍या. त्‍यातील काही मागण्‍यांवर निर्णयही झाले. आजही मातंग समाजाच्‍या मागण्‍यांची सोडवणूक करण्‍यासाठी लोकप्रतिनिधी म्‍हणून विधानसभेच्‍या माध्‍यमातुन विविध संसदीय आयुधांचा वापर करत संघर्ष करेन, अशी ग्वाही यावेळी मुनगंटीवार यांनी ऑनलाइन कार्यक्रमात दिली.