वादळात उद्ध्वस्त झालेल्या घरांच्या दुरुस्तीसाठी मदत करणे, ही राज्यशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे उध्वस्त झालेल्या घरांची दुरुस्तीसाठी नुकसाग्रस्तांना शासनाने रोख मदत करावी, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केली.

शरद पवार यांनी वादळग्रस्त माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन तालुक्यांना भेट दिली व नुकसानीची पहाणी केली. यानंतर त्यांनी श्रीवर्धन येथे आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.  यावेळी पवार म्हणाले, लातूर प्रमाणे कोकणात घरबांधणीसाठी मदत देता येणार नाही, त्यामुळे वादळग्रस्तासाठी रोख मदत देणे आवश्यक आहे. फळबागांचे नुकसान झाले आहे. त्यांना मदत देतांना पारंपारीक निकष बदलावे लागतील.  तसेच, हेक्टरी नुकसान भरपाई न देता, झांडांच्या संख्येनुसार मदत दिली पाहिजे, तसेच घराभोवती पडलेली झाडे उचलण्यासाठी व परिसर स्वच्छ करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून पैसे दिले जावेत. फळबाग लागवडीसाठी रोजगार हमी योजना शासनाने लागू करावी. त्यासाठी झाडे उपलब्ध करून द्यावी अशा सुचना देखील त्यांनी यावेळी केल्या.

वीज पुरवठा सुरळीत करणे व पाणी पुरवठा योजना सुरु करणे यांना प्राधान्य द्यावे, त्यासाठी जास्त मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. घरांचे पंचनामे करत असतांना घरातील अन्यधान्य आणि सामानाच्या नुकसानीचे पंचनामे करावेत. त्याधर्तीवर त्यांना मदत द्यावी. मी रायगड जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची माहिती केंद्र व राज्यसरकारला देणार आहे. त्यानुसार धोरण ठरविण्याबाबत पाठपुरावा केला जाईल. माझ्याकडून जी मदत करता येईल ती मिळवून देण्याचा प्रयत्न करीन असेही त्यांनी यावेळी सांगीतले. यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार अनिकेत तटकरे, नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक उपस्थित होते.

‘निसर्ग’ चक्रीवादळाने कोकणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून, या नुकसानीच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे आजपासून कोकण दौर्‍यावर आहेत. आज रायगड जिल्ह्यातील नुकसानीची त्यांनी पाहणी केली.

सर्वात प्रथम सकाळी ११. ३० वाजता माणगाव येथील बाजारपेठेची  त्यांनी पाहणी केली. त्यानंतर म्हसळा येथील मदरशाला भेट देत, नुकसानीची माहिती घेतली व स्थानिकांकडून माहिती घेतली.  दिवेआगारचे सरपंच उदय बापट यांच्या चिकू, नारळ बागेच्या झालेल्या नुकसानीची व श्रीवर्धन, हरिहरेश्वर या नुकसानग्रस्त भागाचीही पाहणी केली. जीवना बंदर येथील रहिवाशांनी आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. त्यात तातडीने वीज पुरवठा सुरू करण्याची व विभागात झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी शरद पवार यांनी कोकणातील शेतकऱ्यांना सरकार तुमच्यासोबत आहे, असा दिलासा दिला.  श्रीवर्धन येथे आमदार, खासदार आणि अधिकारी यांच्यासमवेत सायंकाळी एक बैठक घेऊन अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे योग्यरीत्या करुन जास्तीत जास्त भरपाई कशी मिळेल यासाठीच्या सूचना केल्या.

उद्या (बुधवार) सकाळी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीकडे शरद पवार रवाना होणार असून दोपोली, मंडणगड येथील नुकसानीची पाहणी करणार आहेत. शिवाय येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेटही घेणार आहेत.

दरम्यान रायगड जिल्हयात राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनिल तटकरे, रायगडच्या पालकमंत्री आणि विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार बाळाराम पाटील, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर , श्रीवर्धनचे उपविभागीय अधिकारी अमित शेडगे व इतर अधिकारी आज त्यांच्या सोबत होते.