औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी २० जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने प्रशासकीय पातळीवर विकासकामांना पुन्हा खीळ बसली आहे. आचारसंहितेमुळे शनिवारी (दि. २४) जिल्हा नियोजन समितीची बैठक घ्यावी की नाही, या विषयी मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. निवडणूक जाहीर झाली असली, तरी अनेक प्रश्नांचे गुंते अजूनही कायम आहेत. या निवडणुकीत नकाराधिकाराचा (नोटा) वापर करायचा की नाही, हे अजून ठरले नाही. तसेच मतदारांपर्यंत पोलचीट द्यायचा की नाही, हेही ठरले नाही. या मतदारसंघाचे आमदार म्हणून काम करणारे सतीश चव्हाण मागील वर्षभरापासून निवडणुकीची तयारी करीत आहेत. भाजपचा उमेदवार मात्र अजून ठरला नाही.
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात गेल्या वेळच्या निवडणुकीत ४५८ मतदान केंद्रे होती. या वेळी त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. मतदान केंद्रांबाबतचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने बुधवारी निवडणूक आयोगास पाठविला. मराठवाडय़ातील आठही जिल्ह्य़ांत विस्तारलेल्या मतदारसंघात आतापर्यंत ३ लाख ६८ हजार मतदारांनी नोंदणी केली. गेल्या वेळी २ लाख ७२ हजार मतदार होते. यात ९६ हजारांची भर पडली. नव्याने मतदार यादीत नाव नोंदविता येईल का, या विषयीही प्रशासनात संभ्रम आहे. आयोगाच्या निर्देशानुसार नामनिर्देशन पत्र भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मतदार नोंदणी करता येऊ शकते. ३ जून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. मात्र, आयोगाच्या सूचनेनुसार मतदार नोंदणी करताना सुनावणी घेण्यासही काही वेळ द्यावा लागतो. तो हाती शिल्लक नसल्याने मतदान नोंदणी कधीपर्यंत करायची, या विषयीही मंगळवारी दिवसभर खल सुरू होता. आदर्श आचारसंहितेबाबत स्वतंत्र सूचना दिल्या जातील, असेही कळविण्यात आले आहे.
–चौकट—
पदवीधर मतदारसंघाचा कार्यक्रम
२७ मे- अधिसूचना जारी करणे
३ जून- नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम तारीख
४ जून- उमेदवारी अर्जाची छाननी
६ जून- उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख
२० जून- मतदान
२४ जून- मतमोजणी
पदवीधर मतदारसंघाचा इतिहास
– १९७८ मध्ये धुळे, जळगाव, नाशिक व मराठवाडा या संयुक्त मतदारसंघातून दोन उमेदवार निवडून जात असत. मराठवाडय़ातून पहिल्यांदा कुमुदताई रांगणेकर निवडून आल्या.
– १९८४ मध्ये मराठवाडय़ातील ८ जिल्ह्य़ांसाठी स्वतंत्र पदवीधर मतदारसंघ झाला. भाजपचे सुरेश हिरे विरुद्ध वसंत काळे अशी निवडणूक झाली.
– १९९० मध्ये जयसिंगराव गायकवाड व वसंत काळे यांच्यातील अटीतटीच्या लढतीत गायकवाड विजयी.
– १९९६ मध्ये युतीचे सरकार असताना राज्यमंत्री असणाऱ्या जयसिंगरावांनी वसंत काळे यांना मोठय़ा मताधिक्याने पराभूत केले. जयसिंगराव गायकवाड यांनी लोकसभेची निवडणूक लढविली. ते विजयी झाल्याने सन १९९८-९९ मध्ये या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली.
– १९९८-९९ मध्ये भाजपचे संजय निंबाळकर यांचा पराभव. वसंत काळे विजयी. कालावधी संपल्याने २००२ मध्ये पुन्हा निवडणूक.
– २००२ मध्ये श्रीकांत जोशी विरुद्ध वसंत काळे लढतीत जोशी विजयी.
– २००८ श्रीकांत जोशी विरुद्ध राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण लढत; चव्हाण विजयी.
पदवीधरच्या राजकीय घडामोडी
– मुंडे-गडकरी शीतयुद्धाचे परिणाम जाणवू नयेत म्हणून ९ महिन्यांपूर्वी पदवीधरची निवडणूक न लढविण्याचा जोशी यांचा निर्णय.
– भाजपचा उमेदवार ठरविण्यासाठी सरचिटणीस सुजीतसिंह ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली समिती, अहवाल गुलदस्त्यात.
– राष्ट्रवादीने हा मतदारसंघ नव्याने बांधला आहे. आमदार चव्हाण यांनी विद्यापीठाच्या कारभारावर बारकाईने लक्ष ठेवले. शैक्षणिक संस्थांमध्येही त्यांनी संपर्क वाढविला.