दिगंबर शिंदे

पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत अंतिम टप्प्यात प्रचाराची रणधुमाळी उडाली आहे. भाजप विरूध्द महाविकास आघाडी असा जरी सरळ सामना दिसत असला तरी या निवडणुकीचे अंतरंग मात्र साखर कारखानदारांमधील युध्द  असेच स्वरूप मिळाले आहे. या निवडणुकीला जोडूनच शिक्षक मतदार संघाचीही निवडणूक होत आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक संस्थांचे जाळे आहे अशा संस्थामधील नोकरदार कोणत्या बाजूला झुकतात, यावर अटीतटीच्या निवडणुकीतील यशापयश निर्णायक ठरणार आहे.

भाजपचा हा गड मानला जातो. गेल्या दोन निवडणुकीमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले होते. तत्पुर्वी केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले होते.

भाजपने या निवडणुकीमध्ये दिग्गजांना डावलून संग्राम देशमुख यांना उमेदवारी दिली. मागील निवडणुकीमध्ये दादांना विजय मिळाला तो केवळ राष्ट्रवादीतील बंडखोरीमुळे. भाजपने भाजपने देशमुखांना उमेदवारी देउन मराठा कार्डाचा वापर केला आहे. विरोधकांकडून कुंडलच्या क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरूण लाड यांनाच उमेदवारी मिळणार हे गृहित धरून ही चाल भाजपने खेळली आहे. मराठा आरक्षणावरून मतांचे ध्रुवीकरण होण्याची भीती असल्याने भाजपकडून ही खेळी आहे.

प्रचाराचे केंद्र सांगलीत

पुणे महसूली विभागातील पुण्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्हयांचा हा मतदार संघ असला तरी खरी रणधुमाळीही सांगलीतच आहे. कारण विजयाचे दावेदार असलेले उमेदवार याच जिल्हयातील आणि सख्खे शेजारी आहेत. लाड हे महाविकास आघाडीचे उमेदवार असले तरी त्यांच्यासाठी राष्ट्रवादीचीच ताकद कार्यरत आहे. या तुलनेत पलूस कडेगाव मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे काँग्रेसचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष तथा राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या गटाचे कार्यकर्ते  हिरीरीने प्रचारात आघाडीवर असल्याचे  दिसत नाही

भाजपचे उमेदवार देशमुख यांची मितभाषी नेतृत्व अशीच ओळख असली तरी त्याच्या बरोबरीने राष्ट्रवादीचे लाड हेही सहकारातील अभ्यासू आणि पुरोगामी चळवळीला सातत्याने मदतीसाठी तत्पर असलेले कार्यकर्ते म्हणून ओळख आहे. स्वातंत्र्य चळवळीचा परंपरागंत वारसा लाड कुटुंबामध्ये आहे. या दोन साखर कारखानदारांची झुंज राजकीय पक्षांनी लावली आहे. या निवडणुकीमध्ये जनता दलाचे प्रा. शरद पाटील हेही मैदानात पुन्हा उतरले आहेत. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची वाणना आहे. प्रचाराच्या धडाक्यात लाड आणि देशमुख यांच्या उमेदवारीबाबत अथवा, ज्या मतदारांसाठी आरक्षित असलेल्या पदवीधरांचे प्रश्न, बेरोजगारीचा मुद्दा, त्यांच्यासाठी काय करता येउ शकेल याकडे लक्ष वेधण्याचा कोणीही प्रयत्न केलेला नाही.

शिक्षक मतदारसंघात चुरस

पदवीधर मतदार संघाबरोबरच शिक्षक मतदार संघासाठीही मतदान होणार आहे. भाजपप्रणित शिक्षक परिषदेचे जितेंद्र पवार आणि महाविकास आघाडीकडून जयंत आसगावकर हे मैदानात उतरले आहेत. याशिवाय जी. के. थोरात, एन. डी. बिरनाळे, दीपक सावंत यांच्यासह ३५ उमेदवार ६८ हजार ५३२ शिक्षक मतदार असलेल्या या निवडणूक रिंगणात आहेत. शिक्षक भारती या संघटनेची उमेदवारी बिरनाळे यांना मिळेल अशी संघटनेच्या सभासदांना खात्री होती. शिक्षकांसाठी चळवळीत काम केलेल्यांना कामाची संधी मिळावी ही रास्त अपेक्षा असतानाही बिरनाळे यांना वंचित का ठेवले हे कळायला मार्ग नाही. विनाअनुदानित शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न जसा आहे तसाच जुनी पेन्शन योजना यासाठी आपण आग्रही राहणार असल्याचे बिरनाळे मतदाराना पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. बंडखोरीच्या ग्रहणाचा कोणाला ङ्गायदा होतो, कोणाला तोटा येतो हे कळायला तीन डिसेंबरची वाट पाहावी लागणार आहे.