राज्यातील ग्रामपंचायतीचे निकाल आज जाहीर झाले. या निवडणुकीत भाजपानं वर्चस्व दाखल असलं, तरी दिवसभर चर्चा राहिली ती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या गावाची. चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केलेली असतानाही भाजपाला पराभव स्वीकारावा लागला. दुसरीकडे शिवसेनेनं खानापूरमध्ये भगवा फडकावला. या निकालावर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना भाष्य केलं. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कोपरखळी लगावली.

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपानं मोठं यश मिळवलं आहे. मात्र, या यशात काही दुःख होणाऱ्या गोष्टी पण आहेत. उदाहरणार्थ माझं गाव खानापूर. मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो की, माझ्या २२०० लोकसंख्या असलेल्या गावाला तुम्ही जगभर पोहोचवलं. त्याबद्दल धन्यवाद. त्या गावातही ९ पैकी तीन जागा भाजपानं जिंकल्या आहेत. त्याही २०० मतांची आघाडी घेऊन. दोन जागांवर १७ आणि ६३ मतांनी पराभव झाला. त्यामुळे ९ पैकी तीन आल्या. लोकांनी दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. पण जसं एका पाटलांचं खानापूर दाखवता… तसं दुसऱ्या जयंत पाटलांचं म्हैसाळा पण दाखवत चला. बाकी कोथळीपासून ढवळीपर्यंत दाखवा, असं चंद्रकांत पाटील म्हणत चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना टोला लगावला.

खानापूरचा निकाल कसा लागला?

खानापूरमधील गावातील नऊ पैकी सहा जागा शिवसेनेने जिंकल्या. दोन जागा राष्ट्रवादीला तर एक जागा काँग्रेसला मिळाली. हा निकाल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना  मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. यापूर्वी चंद्रकांत पाटील यांनी भुदरगड राधानगरी या विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढण्याचे सूतोवाच केले होते. तेव्हा आमदार आबिटकर यांनी येथे येऊन लढून तरी दाखवा’ असे आव्हान दिले होते. तेव्हा टळलेली लढत ग्रामपंचायतीच्या निमित्ताने यंदा झाली, त्यात आबिटकर यांनी पाटील यांना शह दिला.