पारनेर : विरोधात मतदान केले म्हणून पाण्यापासून वंचित राहण्याची अजब शिक्षा कान्हूरपठारच्या प्रभाग दोन मधील नागरिक भोगत आहेत. तब्बल ३५ वर्षे सर्व जागा जिंकण्याचा विक्रम करणाऱ्या अॅड. आझाद ठुबे यांना यंदा प्रभाग दोन मधील त्यांच्या उमेदवारांचा पराभव चांगलाच झोंबला असून, या प्रभागाचा पाणीपुरवठा बंद करण्याचे फर्मान त्यांनी सोडले आहे!
कम्युनिस्ट पक्षाचे नेतृत्व करीत असलेले अॅड. ठुबे हे तसे संयमी राजकारणी. याच संयमाच्या जोरावर त्यांनी संपूर्ण गावाला आपल्या मुठीत ठेवले. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र त्यांना बराच संघर्ष करावा लागला. नेहमी विजयी व विरोधी उमेदवारांच्या मतांमध्ये असलेले अंतरही काही प्रभागात बरेच कमी झाले, तर प्रभाग २ मध्ये ठुबे यांच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. दोन सदस्यांचा पराभव हा तसा नगण्य विषय. ११ सदस्यांचे पूर्ण बहुमत व मोठय़ा मताधिक्यासह सरपंच गोकुळ काकडे यांचा विजय झालेला असतानाही विरोधकांच्या ताब्यात गेलेल्या दोन जागा हाच चर्चेचा विषय ठरला!
दिलीप ठुबे यांच्या नेतृत्वाखालील मंडळाच्या छाया दत्तात्रय ठुबे व अर्जुन गंगाराम नवले हे अनुक्रमे ६१ व ११२ मतांनी विजयी झाले.
या प्रभागातील पराभव अॅड. आझाद ठुबे यांच्यासह त्यांच्या समर्थकांना चांगलाच झोंबला. मतमोजणीनंतर बुधवारी या प्रभागात पाणीपुरवठा कर्मचाऱ्याने टँकर नेऊन नागरिकांना पाण्याचे वितरण केले. मात्र ही बाब अॅड. ठुबे यांना चांगलीच खटकली. त्यांनी सबंधित कर्मचाऱ्याशी संपर्क करून त्याची कानउघाडणी केली. विरोधात मतदान करणाऱ्यांना का पाणी दिले, याचा जाबही त्यांनी विचारला. त्यानंतर मात्र लंगडे मळा, झाप, नवेगावठाण, ठुबे मळा, नवलेवाडी, माळवाडी, गायखे वस्ती व गारगुंडी रोड परिसरात पाण्याची निर्जळी निर्माण झाली आहे. शासनाकडून पुरवण्यात आलेला टँकर या प्रभागात येत नाही. परिणामी, नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
नवनिर्वाचित सदस्य छाया ठुबे व अर्जुन नवले यांनी यासंदर्भात तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून पाण्याची सोय न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 2, 2018 1:57 am