05 April 2020

News Flash

सांगलीत प्रस्थापितांना सावधतेचा इशारा!

काँग्रेस-राष्ट्रवादीतील संघर्ष कमी; ग्रामीण भागात शिवसेनेलाही यश

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

काँग्रेस-राष्ट्रवादीतील संघर्ष कमी; ग्रामीण भागात शिवसेनेलाही यश

जिल्ह्य़ातील निम्म्याहून अधिक ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपाने प्रथमच क्रमांकाचे स्थान मिळविल्याचा दावा केला असला तरी मतदारांनी मात्र जो जे वांछेल तो ते लाहो असा कौल देत असतानाच प्रस्थापितांना मात्र सावधानतेचा इशारा दिला आहे. यानिमित्ताने भाजपा, शिवसेना ही ग्रामीण भागात पोहचली असली तरी ही निवडणूकच मुळात पक्षविरहित असल्याने स्थानिक आघाडय़ांनीही चांगलीच बाजी मारली आहे.

गावपातळीवरील संघर्ष आजही टोकाचा असल्याचे दिसत असले तरी या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील टोकाचा संघर्ष कमी झाला असल्याचे दर्शवीत असतानाच भाजपाबरोबर शिवसेनाही दखलपात्र असल्याचा संदेश ग्रामीण मतदारांनी दिला आहे.

जिल्ह्य़ातील ६९९ गावांपकी ४५३ गावांत थेट सरपंच निवडीसह सदस्य निवडण्याची प्रक्रिया या निवडणुकीत पार पडली. या निवडणुकीत १२२ ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात आल्याचा दावा केला जात असून, भाजपाकडे ११५ आणि एकेकाळी अख्ख्या जिल्ह्य़ावर वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादीकडे १०७ गावांची सत्ता आली आहे. शिवसेनेने प्रथमच गावपातळीवरच्या राजकारणात शिरकाव केला असून सेनेकडे ३२ ग्रामपंचायती आहेत. यापकी कवठेमहांकाळ तालुक्यातील हरोलीची एकमेव ग्रामपंचायत वगळता अन्य सर्व खानापूर-आटपाडीमधील आहेत. स्थानिक आघाडी आणि शिवसेना यांना ७८ ठिकाणी सत्ता मिळाली आहे.

काँग्रेसचे नेते डॉ. पतंगराव कदम यांनी निकालादिवशीच हा भाजपाचा परतीचा प्रवास सुरू असल्याचे जाहीर करून टाकत असताना जिल्हा परिषद निवडणुकीत काही चुका झाल्याचे मान्य केले. भाजपाला ११५ गावांची सत्ता मिळाली असली तरी यामध्ये अपेक्षित यश मिळाले असे म्हणता येणार नाही.

खासदारासह जिल्ह्य़ात भाजपचे चार आमदार आहेत. जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष आहे, जिल्हा बँकेत निम्मी सत्ता आहे. जत, शिराळा, सांगली आणि मिरज या मतदारसंघाचे नेतृत्व भाजपाकडे आहे. बाजार समितीत काँग्रेसची सत्ता असली तरी भाजपा खासदारांची ऊठबस आहे. तरीही जिल्ह्य़ात भाजपला एकहाती यश मिळविता आलेले नाही.

तासगावमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपाला रोखले होते. आता मात्र खासदारांनी जातीने लक्ष घातल्याने तालुक्यावर वर्चस्व राखत असताना कवठेमहांकाळमध्ये पक्षांतर्गत विरोधक अजितराव घोरपडे यांच्या गटाला शह देण्याचा प्रयत्न केला. मात्र यासाठी त्यांनी काँग्रेसला जवळ केल्याचा आरोप होत आहे. तिकडे डॉ. कदम यांच्या पलूस कडेगाव तालुक्यात भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या वारूला लगाम घालण्याचे काम करण्यात आले.

जतमध्ये भाजपाचे आमदार विलासराव जगताप यांना अपेक्षित यश मिळालेले नाही. रसातळाला असलेल्या काँग्रेसला विक्रम सावंत यांनी ऊर्जतिावस्था देत असताना ३३ ग्रामपंचायतीची सत्ता पटकावली आहे. वाळव्यात आमदार जयंत पाटील यांनी आपले वर्चस्व राखत असताना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना रोखण्याचे काम  केले. कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत आली आहे. यातील कच्चे दुवे वेळीच मुजविले नाहीत तर राष्ट्रवादीच्या या गडावर कब्जा करण्याचा प्रयत्न भाजपाचा असला तरी घोरपडे यांच्या विकास आघाडीचा अडसर कायम राहण्याची चिन्हे आहेत.

’शिराळ्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र येण्याचा पायंडा कायम ठेवला असून याचा फटका भाजपाचे आमदार शिवाजीराव नाईक यांना रोखण्यासाठी होत आहे. खानापूर-आटपाडीमध्ये काँग्रेसने ग्रामीण भागात यश मिळवीत असताना शिवसेनेचे आ. अनिल बाबर यांच्या महत्त्वाकांक्षेला लगाम लावला आहेच, पण आटपाडीत तानाजी पाटील यांच्या सेनेच्या यशाने भाजपावासीय झालेले राजेंद्रअण्णा देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांनाही इशारा दिला आहे.

’गाव पातळीवर झालेल्या या निवडणुकीत आमच्याच पक्षाने बाजी मारली असल्याचा दावा सर्वच पक्षाचे नेते करीत असले तरी या निवडणुका मुळात पक्षीय पातळीवर नव्हत्याच. पक्षाच्या चिन्हावर या निवडणुका लढविल्या नसल्याने याचे श्रेय एखाद्या पक्षाला देणे उतावीळपणाचे ठरेल. मात्र भविष्यातील राजकीय गणितांची पायाभरणी होत असल्याचे राजकीयदृष्टय़ा दखलही घ्यावीच लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2017 1:28 am

Web Title: gram panchayat elections in sangli
Next Stories
1 ऊस दर हा काही रतन खत्रीचा आकडा नाही; सदाभाऊ खोतांचा शेट्टींना टोला
2 सावंतवाडी – दुरांतो एक्स्प्रेसचे इंजिन घसरले, कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प
3 विरोधकांऐवजी स्वतःच्या चुकांमुळेच मोदी सरकार खड्ड्यात जाणार : राज ठाकरे
Just Now!
X