सत्पाळा आणि पालीसाठी ३५ उमेदवार रिंगणात; तीन बिनविरोध

वसई : नवीन वर्षांच्या सुरुवातीलाच वसईत ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. येत्या १५ जानेवारीला सत्पाळा आणि पाली या दोन ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या असून या दोन्ही ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ३५ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तर पाली ग्रामपंचायत क्षेत्रातील ३ उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत.

करोनाकाळात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या  निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात पालघर जिल्ह्यातील तीन ग्रामपंचयतींचा समावेश असून पालघरमधील सांगावे, तर वसई तालुक्यातील पाली व सत्पाळा या ठिकाणी निवडणुका होणार आहेत.

वसईत या दोन ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ७५ अर्ज दाखल करण्यात आले होते. यातील ४० उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने आता ३५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.पाली ग्रामपंचायत हद्दीत ३ प्रभागातील ७ जागा आहेत. या ७ मधील तीन जागा बिनविरोध निवडणूक आल्याने आता ४ जागेवर निवडणूक होत असून ८ उमेदवार रिंगणात आहेत, तसेच सत्पाळा ग्रामपंचायतील ४ प्रभागांत  ११ जागांवर निवडणूक होत असून याठिकाणी २७ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. करोनाकाळ सुरू असल्याने कोणतीही निवडणूक झाली नव्हती. यामुळे वर्षभरातील ही तालुक्यातील पहिलीच ग्रामपंचायत निवडणूक असल्याने विविध राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. येत्या १५ जानेवारीला मतदान होणार असून १८ जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

चिन्हाचे ऑनलाइन वाटप

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या चिन्ह यादीत राजकीय पक्षांची चिन्हे वगळून १९० चिन्हांचा समावेश आहे. यात शिटी, अंगठी, कंगवा, कपात, बॅट,गॅस सिलेंडर,रिक्षा, इस्त्री, चावी, छत्री आदी चिन्ह असून या चिन्ह वाटपाची प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण करून चिन्हाचे वाटप करण्यात आले आहे.

वसईत पाली आणि सत्पाळा या दोन ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम विशेष काळजी घेऊन पार पडावा यासाठी संबंधित अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

— उज्ज्वला भगत, तहसीलदार, वसई