दोघांविरुद्ध गुन्हा

नगर : नेवासा तालुक्यातील बऱ्हाणपूर येथील ग्रामपंचायत सदस्य व राष्ट्रीय किक बॉक्सिंग खेळाडू संकेत भानुदास चव्हाण (२५ ) यांच्यावर गावातीलच दोन तरुणांनी गावठी कट्टय़ातून केलेल्या बेछूट गोळीबारात ते गंभीर जखमी झाले. शनिशिंगणापूर पोलिसांनी यासंदर्भात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाळासाहेब हापसे व विजय भारशंकर अशी दोन आरोपींची नावे आहेत. दोघे फरार असून त्यांच्या अटकेसाठी पथके रवाना केल्याची माहिती शिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सचिन बागुल यांनी दिली. यातील एक आरोपी बाळासाहेब हापसे याच्याविरुद्ध पूर्वी एक जबरी चोरीचा गुन्हा पोलिसांकडे दाखल आहे. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार पूर्ववैमनस्यातून हा गोळीबार केला असावा. सन २०१८ मध्ये संकेत चव्हाण व बाळासाहेब हापसे या दोघांमध्ये वाद झाले होते. त्याचे पर्यवसन मारामारीमध्ये झाले होते. परंतु त्यानंतर हापसे हा कामधंद्यासाठी पुणे येथे गेला. टाळेबंदीमध्ये पुन्हा तो दोन महिन्यांपूर्वी गावाकडे परतला होता.

गोळीबाराची घटना काल, मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. संकेत चव्हाण हे कांगोणी फाटय़ावरून बऱ्हाणपूर येथे घरी स्वत:च्या वाहनाने येत असताना भाऊसाहेब बच्छीराम काळे यांच्या शेताजवळ रस्त्याच्या कडेला  लघुशंकेसाठी थांबले होते. मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी गावठी कट्टयातून संकेत यांच्यावर बेछुट गोळ्या झाडल्या. दंडात, पाठीवर, कमरेवर गोळीबार करून त्यांना जखमी केले. संकेत यांनी स्वत:च मोबाइलवरून वडील भानुदास चव्हाण यांना याची माहिती दिली. भानुदास चव्हाण यांना संकेत हे रस्त्याच्या कडेला खड्डय़ात कोसळलेले आढळले. त्यांना तातडीने नगर शहरातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून चार गोळ्या काढण्यात आल्या, आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली. संकेत यांच्या खांद्याला बरगडीला व कमरेखाली गोळ्या लागल्या.

घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. दिपाली काळे,  शेवगावचे पोलिस उपअधीक्षक सुर्दशन मुंढे, सोनईचे सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे, शिंगणापूरचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागूल यांनी घटनास्थळी धाव घेतली.

यासंदर्भात संकेत चव्हाण यांचे वडील भानुदास जगन्नाथ चव्हाण (५१) यांनी शिंगणापूर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. ते शेती करतात तर मुलगा संकेत हा बांधकाम साहित्य वाहतुकीचा व्यवसाय करतो.