सरावलीत पाच हजारांहून अधिक बेकायदा बांधकामे; महसूल विभागाची डोळेझाक

हेमेंद्र पाटील, बोईसर

पालघर तालुक्यातील सरावली ग्रामपंचायत हद्दीत अनधिकृत बांधकामांचे जाळे वाढत चालले आहे. यात ग्रामपंचायत सदस्यांकडूनच केलेली बेकायदा बांधकामे मोठय़ा प्रमाणात असल्याचे दिसून आले आहे. ग्रामपंचायत सदस्यांचीच बेकायदा बांधकामे असल्याने सरावली येथील इतर नव्याने उभ्या राहणाऱ्या बेकायदा इमारतींवर कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. यातच सरकारी जागेवर बांधकाम करण्यासाठी देखील ग्रामपंचायतीने बेकायदेशीर परवान्या दिल्या असल्याचे उघड झाले आहे. असे असले तरी सरकारी जागेवर बांधकाम उभे राहत असताना महसूल विभागाने कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही.

सरावली ग्रामपंचायत हद्दीत पाच हजारहून अधिक अनधिकृत बांधकामे असल्याची नोंद ग्रामपंचायत दप्तरी आहे. ग्रामपंचायतीला महसूल मिळावा असे कारण पुढे करत कायद्यातील पळवाटा शोधत सरकारी जागेवर असलेल्या अनधिकृत बांधकामांना घरपट्टी देखील दिली जाते. त्यानंतर याच घरपट्टीच्या आधारे घरदुरुस्ती परवानगी देऊन सरकारी जागेवर टोलेजंग इमारती उभ्या करण्यात आल्या असताना देखील महसूल विभागाने नोटीस बजावण्याव्यतिरिक्त आजवर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. अवधनगर, भैय्या पाडा, संजयनगर या भागात सरकारी जागेवर हजारो अनधिकृत बांधकामे गेल्या पाच वर्षांत उभी राहिली आहेत. यातच संजयनगर, अवधनगर, राऊतवाडी, त्रिवेदीनगर व संतोषीनगर या भागात ग्रामपंचायत सदस्य यांची स्वत:ची अनधिकृत बांधकामे असल्याचे उघड झाले आहे. ग्रामपंचायत सदस्य व त्याच्या नातेवाईकांच्या नावेच अनधिकृत बांधकामे असल्याने सरावली भागात इतर उभ्या राहणाऱ्या अनधिकृत बांधकामाला ग्रामपंचायतीकडून संरक्षण मिळत असून त्यावर देखील कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही.

सरावली ग्रामपंचायत हद्दीत संजयनगर येथे सरकारी जागेवर असलेल्या अनधिकृत झोपडय़ांची घरपट्टी लावून नंतर त्या ठिकाणी घरदुरुस्तीच्या नावाखाली ग्रामपंचायतीने बांधकाम परवानगी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. विषेश म्हणजे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची गावठाण हद्द नसताना देखील सरपंच यांनी अमरखान इसाकखान पठाण याला बेकायदेशीरपणे गावठाण दाखला दिल्याचे उघड झाले होते. सरकारी जागा असताना देखील

बांधकाम परवानगी मिळाल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य यांचा भाऊ  भूमाफिया अमरखान इसाकखान पठाण याने सरकारी जागेवर अनधिकृत हॉटेलचे बांधकाम केले आहे. मात्र सरकारी जागा गिळंकृत केली जात असताना देखील पालघर महसूल विभागाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत अनधिकृत बांधकामे होण्यासाठी एक प्रकारे मोकळीक दिल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे.

अनधिकृत बांधकामाला अधिकृत घरपट्टय़ा

सरावली ग्रामपंचायतीकडून अनधिकृत बांधकामाला संरक्षण म्हणून बेकायदेशीरपणे घरपट्टय़ा लावल्या जात आहेत. घरपट्टय़ा लावताना जागा सरकारी आहे की खासगी याची कोणत्याही प्रकारची माहिती घेतली जात नाही. ग्रामपंचायतीने अनधिकृत बांधकामाला घरपट्टय़ा लावल्यानंतर त्या घरपट्टय़ांवर अनधिकृत बांधकाम असा उल्लेख असणे बंधनकारक असते. परंतु ग्रामपंचायत अशा अनधिकृत बांधकाम असलेल्या घरपट्टय़ांवर कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम आहे अशी नोंद करत नसल्याने, अशा घरपट्टय़ांच्या आधारे खरेदी-विक्रीचे व्यवहार देखील केले जात आहेत.

ग्रामपंचायत घरपट्टय़ा देताना अनधिकृत बांधकाम असल्यास त्यांची नोंद घेते. घरपट्टय़ांवर अनधिकृत असा उल्लेख केलेला नाही. काही सदस्यांची देखील अनधिकृत बांधकामे असल्याचे दिसून आले होते.

-सुभाष किणी, ग्रामविकास अधिकारी, सरावली