सोलापूर : सोलापूरचे ग्रामदैवत सिध्देश्वर महाराजांच्या यात्रेला शुक्रवारी नंदीध्वजांच्या मिरवणुकांद्वारे तैलाभिषेकाने प्रारंभ झाला. मंगलमय वातावणात निघालेल्या मिरवणुकीत हजारो भाविकांचा सहभाग होता. या यात्रेला तब्बल नऊशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. पांढरा शुभ्र बाराबंदी पोशाख परिधान करून सश्रध्द भावनेने सहभागी झालेल्या भाविकांच्या गर्दीमुळे मिरवणुकीच्या मार्गाला जणू दूधगंगेचे स्वरूप आले होते. ‘गरीब-श्रीमंत’ असा भेदभाव न करता एकसारखा परिधान केलेला बाराबंदी पोशाख समतेचे प्रतीक समजले जाते. ‘एकदा बोला भक्तलिंग हर बोला हर, सिध्देश्वर महाराज की जय’ अशा अखंड जयघोष सुरू होता.

सकाळी उत्तर कसब्यातील मल्लिकार्जुन मंदिराजवळील हिरेहब्बू मठातून नंदीध्वजांच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला. तत्पूर्वी, परंपरेप्रमाणे साज चढवून सर्व सात नंदीध्वजांचे पूजन करण्यात आले. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे पत्नी उज्ज्वला शिंदे व कन्या आमदारर प्रणिती शिंदे यांच्यासह पालकमंत्री विजय देशमुख हे मिरवणुकीत सहभागी झाले होते. महापौर शोभा बनशेट्टी, सिध्देश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, माजी आमदार विश्वनाथ चाकोते आदींसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. सुमारे २१ किलोमीटर अंतराच्या या मिरवणुकीत अग्रभागी हलगीवाद्यांचे पथक होते. त्यापाठोपाठ पंचरंगी ध्वज, घोडेस्वार, उंटस्वार, रथ, सनई-चौघडा असा लवाजमा होता. पाचपेक्षा अधिक संगीत बॅन्ड पथकांनी एकापेक्षा एक सरस भक्तिसंगीते सादर करून मिरवणुकीत रंग भरला. नाशिक ढोल पथकही होते. तुताऱ्यांनी वातावरण प्रफुल्लित केले. उत्तर कसब्यातून दत्त चौक, माणिक चौक, विजापूरवेस, पंचकट्टामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फाटकाजवळ मिरवणूक आल्यानंतर मानाच्या देशमुख घराण्यातील राजशेखर देशमुख यांनी हिरेहब्बू मंडळींना ‘सरकारी आहेर’ केला. त्यानंतर नंदीध्वज सिध्देश्वर मंदिरात पोहोचले. त्याठिकाणी पूजाविधी संपन्न झाला. सिध्देश्वर महाराजांच्या मूर्तीला हळद लावण्यात आली.

पुढे सिध्देश्वर मंदिरातून शहराच्या पंचक्रोशीत प्रतिष्ठापित ६८ लिंगांना तैलाभिषेक करण्यासाठी नंदीध्वज मार्गस्थ झाले. नऊशे वर्षांपूर्वी प्रत्यक्ष सिध्देश्वर महाराजांनी शहराच्या पंचक्रोशीत ६८ लिंगांची प्रतिष्ठापना केली होती. या सर्व लिंगांना तैलाभिषेक करण्याबरोबरच सिध्देश्वर महाराजांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्यात आले. सिध्देश्वर महाराजांच्या विवाह सोहळ्याच्या ऐतिहासिक घटनेवर आधारित यात्रेत कार्यक्रम पार पाडले जातात. ६८ लिंगांच्या तैलाभिषेकाच्या माध्यमातून शहरात परिक्रमा पूर्ण करण्यात आला. रात्री नंदीध्वज उत्तर कसब्यात हिरेहब्बू मठात येऊन विसावले.

उद्या मंगळवारी सिध्देश्वर महाराजांचा विवाह सोहळा म्हणजे अक्षता सोहळा संपन्न होणार आहे. यात्रेनिमित्त पंचकट्टा, होम मैदान फुलून गेले आहे. सिध्देश्वर मंदिर विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे. सोलापूरचे ग्रामदैवत सिध्देश्वर महाराजांच्या यात्रेला शुक्रवारी नंदीध्वजांच्या मिरवणुकांद्वारे प्रारंभ झाला. या मिरवणुकीत हजारो भाविकांचा सहभाग होता.