जागेची पाहणी केंद्राकडून सुरू

कोकणामध्ये प्रतिवर्ष सहा कोटी टन क्षमतेला भव्य तेलशुद्धीकरण कारखाना आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प उभा करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असून त्यासाठी जागेची चाचपणी केली जात असल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बुधवारी राज्यसभेत दिली. हा प्रकल्प इंडियन ऑइल कॉपरेरेशन (आयओसी), भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या तीन सरकारी कंपन्यांच्या संयुक्त सहकार्यातून दोन टप्प्यांत कार्यान्वित केला जाणार आहे. त्याची कार्यान्वयनाची जबाबदारी इंजिनीअर्स इंडिया लिमिटेडवर सोपविण्यात आली असून त्याला महाराष्ट्र सरकारचे सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, प्रकल्पाची जागा आणि तो पूर्ण करण्याचे वेळापत्रक याबाबत माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. काँग्रेसचे सदस्य हुसेन दलवाई यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. जैतापूरमध्ये अणुऊर्जा प्रकल्प प्रस्तावित असून जनतेच्या विरोधाने त्यास विलंब लागतो आहे. जैतापूर प्रकल्पाला जनतेने मोठय़ा प्रमाणात विरोध केल्यामुळे तेथील प्रकल्पाचे काम अद्यापही रखडलेलेच आहे. त्या पाश्र्वभूमीवर केंद्राला या प्रकल्पाच्यावेळी दक्षता घ्यावी लागेल.