18 October 2018

News Flash

१२० फुटांच्या रांगोळीतून राजमाता जिजाऊ यांना अभिवादन

रांगोळी पाहण्यासाठी लोकांची गर्दी

राजमाता जिजाऊ यांची जयंतीनिमित्त एका कलाकाराने १२० फूट उंच, ६० फूट रूंद अशी रांगोळी काढली आहे. ७ हजार २०० स्क्वेअर फूट आकाराची ही भव्य जिजाऊ मातेची रांगोळी शिरढोण येथील कळंब तालुक्यात राहणाऱ्या राजकुमार कुंभार या तरूण कलाकाराने साकारली आहे. ही रांगोळी काढण्यासाठी तब्बल १८०० किलो रंगीत रांगोळीचा वापर करण्यात आला आहे. ही रांगोळी पाहण्यासाठी लोकांची गर्दी होते आहे. तसेच ड्रोन कॅमेरातून या रांगोळीचे छायाचित्रही काढण्यात आले आहे.

आपल्याला ठाऊक आहेच महाराष्ट्राचे अराध्य दैवत असलेल्या शिवाजी महाराजांच्या मातोश्री म्हणजे जिजाबाई. त्यांनी शिवाजी महाराजांवर लहानपणापासूनच संस्कार घडवले. स्वराज्य आणि स्वराज्याच्या निर्मितीसाठी शिवाजी महाराजांना तयार केले. रयतेचा राजा शिवाजी महाराजांच्या रूपाने घडवला. अशा जिजामातेचा आज जन्मदिवस आहे. हेच औचित्य साधत शिरढोण येथील कळंब तालुक्यात राहणाऱ्या कलाकाराने ही भव्य दिव्य रांगोळी साकारली आहे. जिजामातेला केलेला हा मानाचा मुजराच आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर गुलाबी रंगाची साडी नेसलेल्या, राजेशाही अलंकार घातलेल्या जिजाऊंचे हे देखणे रूप हाती तलवार घेतलेले आहे. त्यांचा स्वाभिमान आणि त्यांचा करारी बाणा या रांगोळीत अचूक टिपण्यात आला आहे. तसेच राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा अशी अक्षरेही रांगोळीच्या खाली लिहिण्यात आली आहेत. ही भव्य दिव्य अशी रांगोळी म्हणजे आजच्या दिवशी जिजाऊंना दिलेली मानवंदनाच आहे.

First Published on January 12, 2018 9:51 pm

Web Title: grand rangoli of jijamata in shirdhon on her birth anniversary