आजीचा खून करुन तिचा अंत्यविधी गुपचूप करुन पुरावा नष्ट करणा-या नातवाला आणि अन्य तिघांना महाड तालूका पोलिसांनी अटक केली. या चौघांवर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४ मार्च रोजी ही घटना घडली होती. महिनाभरानंतर या खूनाचा उलगडा झाला.

महाड तालुक्यातील आंबीवली  येथील द्रौपदी पांडूरंग पवार  (वय ७४) यांचे ४ मार्चला रात्री निधन झाले होते. त्यांच्यावर ५ मार्चला अंत्यसंस्कार करण्यात आले. परंतु पोलीसांना हा घातपात असल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी याप्रकरणाची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करून तपास सुरु केला. महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक एन.एम.गवारे व उपनिरिक्षक महेश कुचेकर हे या प्रकरणाचा तपास करत होते.

तपासात पोलीसांचा संशय खरा ठरला. द्रोपदी पवार आणि त्यांचा नातू रुपेश जनार्दन पवार( वय-३३)यांच्यात कायम वाद होत असत. यातूनच रुपेश आणि त्याच्या सहकाऱ्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. ४ मार्चला द्रोपदी पवार आणि रुपेश यांच्यात पुन्हा एकदा वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. संतापलेल्या रुपेशने अंगणात असलेल्या फरशीने आजीच्या डोक्यात वार करुन तिला ठार मारले आहे. यानंतर रुपेश तसेच रमेश पवार (वय ५५) सुधीर मोहिते व श्रीकांत मोहिते( रा.आंबिवला ब्रु) यांनी परस्पर मृत द्रोपदी यांचा अंत्यविधी गुपचूप उरकून घेतला.   मात्र काही दिवसानंतर गावात या प्रकरणाची चर्चा सुरु झाली. पोलिसांनाही या प्रकरणाचा संशय आला. त्यामुळे त्यांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास करून चौघांवरही गुन्हा दाखल केला.