News Flash

बोगस पटसंख्या दाखवून आदिवासी आश्रमशाळेत अनुदानाची लूट

धक्कादायक म्हणजे, येथे मुला-मुलींसाठी सामूहिक स्वच्छतागृह असल्याचे दिसून आले.

प्रशासकीय यंत्रणेला लक्ष्मीदर्शन घडवून अनेक अनुदानित आश्रमशाळा बोगस पटसंख्येच्या आधारे शासकीय अनुदानाची प्रचंड लूट करीत असल्याचे दाहक वास्तव काही आश्रमशाळांना दिलेल्या भेटीत ‘याची देही याची डोळा’ अनुभवले. वाशीम जिल्ह्य़ातील सोंडा व पोहरादेवीजवळच्या उमरी येथील आश्रमशाळांमध्ये हा प्रकार सर्रास सुरू असल्याचे चौकशीअंती दिसून आले.

सोंडा येथील अनुदानित आश्रमशाळा गत २०-२५ वषार्ंपासून सुरू आहे. या शाळेचे नाव प्रियंका आश्रमशाळा, तर वसतीगृहाचे नाव नाथनंगे महाराज आहे. उमरी बु.(ता.वाशीम) येथील आश्रमशाळेचे नाव श्री गजाधरजी राठोड आश्रमशाळा, असे आहे. शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांंच्या बोगस नोंदी दाखवून आजवर लाखो रुपयांचे अनुदान हडपल्याचे या भेटीत दिसून आले. या आश्रमशाळेत १७७ विद्यार्थ्यांंची पटसंख्या दाखविण्यात आली. १४० विद्यार्थ्यांना निवासी वसतीगृहात दाखविण्यात आले आहे. मात्र, वसतीगृहात प्रत्यक्षात १५ ते २० मुले व १२ मुली असल्याचे आढळून आले. या वसतीगृहातील जेमतेम विद्यार्थ्यांंनाही सुविधा दिल्या जात नसल्याचे दिसले. त्यांच्या भोजनाची व्यवस्थाही तोकडीच आहे. सकाळी पूर्ण जेवण व संध्याकाळी फक्त खिचडी दिली जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या व्यतिरिक्त सकाळचा नास्ता व जेवणात पौष्टीक आहार या मुलांनी कधीही बघितलेला नाही. वसतीगृहातील १२ मुलींसाठी मदतनीस म्हणून स्त्री कर्मचारीच नाही. त्यामुळे या मुली असुरक्षित असल्याचे दिसून आले. वसतीगृहात ३० ते ३२ पलंग, पण त्यावर गाद्यांची व्यवस्था दिसली नाही. पूर्ण वसतीगृहात ही सामुग्री उपलब्धही नव्हती. हिवाळ्यात मुलांना ब्लॅकेटस् आणि गत दोन वर्षांंपासून गणवेशही दिलेले नाही.

धक्कादायक म्हणजे, येथे मुला-मुलींसाठी सामूहिक स्वच्छतागृह असल्याचे दिसून आले. संस्थाचालक मात्र सबंधित विभागाला मॅनेज करून शासकीय अनुदानावर ताव मारीत आहे. हीच परिस्थिती उमरी बु. या पोहरादेवीच्याजवळच्या आश्रमशाळेतही दिसून आली. कुंभी (ता.वाशीम) येथून हस्तांतरण झालेली ही आश्रमशाळा शेंदोना व नंतर उमरी येथे हलविण्यात आली. येथे प्रस्तुत प्रतिनिधीने भेट दिली तेव्हा मुख्याध्यापक गरहजर होते. वसतीगृह अधीक्षकांकडून  संस्थेबाबत माहिती घेतली तेव्हा पटावर १२० विद्याथ्यार्ंची नोंद असल्याचे सांगण्यात आले व ते सर्व वसतीगृहात असल्याची माहिती देण्यात आली. प्रत्यक्षात मात्र १५ ते २० मुले व एकच मुलगी वसतीगृहात हजर होती. ही मुलगी तिसऱ्या वर्गातील असून तिचे नाव मंगला शिवाजी लांडगे असल्याचे तिने सांगितले. याबाबत अधिक माहिती मिळविली असता फक्त ३ मुली वसतीगृहात कायमस्वरूपी असल्याचे समोर आले. त्यांची निवास व्यवस्थाही मुलांबरोबर व पुरुष कर्मचाऱ्यांबरोबर एकत्र करण्यात येत असल्याचे धक्कादायक वास्तव चौकशीत पुढे आले. त्यामुळे या तिन्ही चिमुरडय़ा अत्याचाराला बळी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या दोन आश्रमशाळांना दिलेल्या भेटीतून समोर आलेले वास्तव हादरविणारे आहे. शासनस्तरावरून अशा शासकीय आश्रमशाळांची तपासणी नियमित होत नसल्याने  त्यांचा गरफायदा संस्थाचालक मोठय़ा प्रमाणात घेत आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2016 1:29 am

Web Title: grant loot by tribal ashram school
Next Stories
1 ‘मेळघाट पॅटर्न’ कागदावरच!
2 काँग्रेस, राष्ट्रवादीने चिंतन करावे-माधव भंडारी
3 परतूरमध्ये मंत्री लोणीकर यांची प्रतिष्ठा पणाला
Just Now!
X