वसईच्या ग्रामीण भागातील करोना रुग्णांना मोठा दिलासा

वसई : वसई-विरार शहरात करोनाबाधितांची संख्या ही झपाटय़ाने वाढू लागली आहे. त्यामुळे नव्याने आढळून येणाऱ्या करोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी जागा मिळणे कठीण होऊन बसले होते. हीच बाब लक्षात घेता वसई पूर्वेतील उसगाव येथे श्रमजीवी करोना काळजी केंद्राची उभारणी करण्यात आली असून सध्या स्थितीत १०० खाटांची सुविधा या केंद्रात उपलब्ध करण्यात आली आहे.

नुकताच या करोना केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित व शासकीय अधिकारी यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या वेळी बोलताना फडणवीस यांनी आता सुरू असलेली करोना लाट ही भयंकर असून कुटुंबच्या कुटुंब संक्रमित होत आहेत. सर्व वयोगटांतील व्यक्तींना याची लागण होत असून यात तरुणाचे ही बळी जात आहेत.

या संक्रमणामुळे आपली आरोग्य व्यवस्था कुठे तरी कमी पडत असल्याचे त्यांनी सांगितले. तर या कठीण परिस्थितीत रुग्णाचे आरोग्य सांभाळणारे डॉक्टर, नर्स यांचे आभार मानत करोनाबाबत केंद्र सरकारने महाराष्ट्राला सर्वाधिक म्हणजे १ हजार ८०० टन इतका प्राणवायूचा साठा दिला आहे. तसेच रेमडेसिविरसुध्दा उपलब्ध करून दिले असल्याचे नमूद करताना राज्य सरकारच्या कारभारावर अप्रत्यक्ष ताशेरे ओढले. पालघरसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्य़ाला अनाथासारखी वागणूक दिली जात असल्याचा आरोप ही त्यांनी या वेळी केला.

ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा

‘श्रमजीवी कोविड सेंटर’ हे वसई पूर्वेतील उसगाव येथे सुरू केलेले पहिले करोना काळजी केंद्र आहे. करोनाबाधित रुग्णांच्या विलगीकरणासाठी  विधायक संसद या संस्थेची एकलव्य गुरुकुल ही शाळा आता १०० खाटांच्या करोना काळजी केंद्रात रूपांतरित करण्यात आली आहे. तसेच येथे २० प्राणवायू सिलेंडरची व्यवस्था ही ठेवण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण नागरिकांना मोठा फायदा मिळणार असून जर करोनाची लागण झाली तर या भागातील नागरिकांना वसई, विरार, नालासोपारा किंवा विक्रमगड या ठिकाणी जावे लागणार नाही.