कचरा वर्गीकरणाच्या नियमाला नागरिकांसह पालिकेकडूनही हरताळ

कल्पेश भोईर, लोकसत्ता

वसई : पर्यावरणास हानिकारक असलेला सुका कचरा ओल्यासोबतच वसई-विरार पालिका हद्दीतील कचराभूमीत सध्या टाकला जात आहे.  नागरिक ओला आणि सुका कचरा वेगवेगळा न करता तो एकाच ठिकाणी ठेवत आहेत. त्याच वेळी पालिकेनेही या कचऱ्याचे वर्गीकरण न करता तो वाहनांमध्ये तसाच कोंबून कचराभूमीवर रिता करणे सुरू ठेवले आहे.

वसई-विरार पालिका क्षेत्रातील रहिवाशांना कचरा वर्गीकरणाची सक्ती करण्याआधी पालिकेने जागृतीवर भर दिला आहे. यासाठी सध्या मार्गदर्शन शिबिरे घेतली जात आहे. मात्र, या साऱ्या प्रक्रियेत पालिकेचे श्रम वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

वसई-विरार पालिका हद्दीत दिवसाकाठी साधारण ७०० टन कचरा जमा होतो. रोज १००हून अधिक वाहनांमधून हा कचरा कचराभूमीत टाकला जातो. शहरात कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात यावे यासाठी पालिका क्षेत्रात ठिकठिकाणी हिरव्या आणि निळ्या रंगाच्या कचराकुंडय़ा ठेवल्या होत्या. त्याच वेळी गृहसंस्थांना कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र, नागरिकांचा त्याला प्रतिसाद न मिळाल्याने सफाई कर्मचाऱ्यांकडूनही हा कचरा एकाच ठिकाणी गोळा करून भोयदापाडा येथील कचराभूमीत एकत्र टाकला जात आहे. याच वेळी मोठय़ा प्रमाणावरील  कचरा एकत्रित येत असल्याने त्याचे वर्गीकरण करणे सफाई कर्मचाऱ्यांना शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

कचखाऊ धोरण

गेली अनेक वर्षे कचरा वर्गीकरणावर पालिकेकडून भर देण्यात न आल्याने सर्वच कचरा एकाच ठिकाणी गोळा केला जात आहे. यावर दर वेळी शहरातील कचऱ्याच्या समस्येविषयी सामाजिक संस्थांकडून आवाज उठवला जातो. मात्र, त्यावर पालिका प्रशासनाकडून कठोर भूमिका न घेतल्याने कचरा वर्गीकरणाची अंमलबजावणी बारगळली आहे. पालिकेने अद्याप घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविलेला नाही.  त्यामुळे कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने पर्यावरणाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याच वेळी पालिका प्रशासनाकडे कचरा वर्गीकरणाबाबत ठोस धोरणच नसल्याने गृहसंस्थांमध्ये मार्गदर्शन शिबिरांत नेमके सांगायचे काय, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. अनेक नागरिकांनी यावर पालिकाच कचऱ्याचे वर्गीकरण करीत नसेल तर नागरिकांनी करून फायदा काय, असा सवाल केला आहे. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करण्यासाठी पालिका प्रशासनच उदासीन आहे, तर मग तो नागरिकांकडून करून घेण्यास पालिका कसा काय आग्रह धरू शकेल, असा मुद्दा काही रहिवाशांनी उपस्थित केला आहे.

उपाययोजना अशा..

* ज्या गृहसंस्थांचा कचरा १०० किलोहून अधिक आहे. त्या कचऱ्याची  विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प उभारण्याचे आवाहन करण्यात येत आहे. असा प्रकल्प असणाऱ्या गृहसंस्थांना मालमत्ता करात पाच टक्के सूट देण्याचे पालिकेने जाहीर केले आहे.

* शहरात कचराकुंडय़ांची दुरवस्था झाल्याने त्यातील कचरा बाहेर पडून तो अस्ताव्यस्त पसरला जात होता. त्यामुळे पालिका प्रशासनासमोर नव्याच अडचणी निर्माण झाल्या होत्या. यावर उपाय म्हणून पालिकेने नवीन १५ हजार कचराकुंडय़ांच्या खरेदीसाठी प्रस्ताव तयार केला. यातील काही कुंडय़ांची खरेदी करण्यात आली असून त्यांचे वितरणही सुरू करण्यात आले आहे.

* कचरा वर्गीकरणासाठी ओला आणि सुका कचरा असे कप्पे (कम्पार्टमेंट) असलेले ५० नवीन टिपर ही खरेदीसाठी निविदा काढण्यात आली आहे. कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावता यावी कचरा वर्गीकरण यंत्र कचराभूमीवर बसविण्याचे विचाराधीन आहे.

कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पालिकेकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. कचरा वर्गीकरण करण्यासाठीही विविध प्रकारच्या उपाययोजना पालिकेच्या क्षेत्रात राबविण्यात येत आहेत.

– नीलेश जाधव, घनकचरा व्यवस्थापन अधिकारी महापालिका