भाज्यांच्या महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना आता मिरचीच्या वाढीव दरांची फोडणी सहन करावी लागणार आहे. जून महिन्यातील पंधरा दिवस होऊनही पाऊस झालेला नाही. राज्यातील काही भागांत अद्याप पाणीटंचाईमुळे दुष्काळी स्थिती कायम आहे. शेतीला पाणी नसल्यामुळे भाजीपाल्याच्या उत्पदनामध्ये प्रचंड प्रमाणात घट झाली आहे. परिणामी गेल्या काही महिन्यापासून भाजीपाल्याचे दर वाढत आहेत. वेळेवर पाऊस पडला नाही तर आणखी भाव वाढण्याची शक्यता आहे.

अहमदनगरमध्ये मिरची चक्क शंभर रूपये किलो झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या खिशाली झोंबणारी महागाई असल्याच्या चर्चा सुरू आहेत. गेल्या महिन्यात ८० रूपये किलो असणारी मिर्ची सध्या १०० रूपये किलो झाली आहे. मिरचीशिवाय लसूण, कारले घेण्यासाठी ग्राहकांना किलोमागे १२० रूपये मोजावे लागत आहेत. आले, कोथिंबीर, कडिपत्त्यासोबत मिळणाऱ्या हिरव्या मसाल्यातून मिरच्या गायब होऊ लागल्या आहेत. इतर भाज्यांचे दरही गेल्या पंधरवडय़ाच्या तुलनेत वाढले आहेत.

१५ ते २० टक्के रूपयांनी भाव वाढळ्यामुळे सर्वसामान्यांना मिरचीचा चांगलाच ठसका बसला आहे. राज्यातील बहुतांश शेतकरी पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. जून महिन्यात अपेक्षित पाऊस अद्याप झालेला नाही. त्यामुळे भाजीपाला येण्यासाठी वेळ लागणार आहे. चांगला पाऊस झाल्यानंतर महिना ते दीड महिन्यानंतर भाजीपाल्याचे भाव आवक्यात येऊ शकतात.

भाज्या आणि मिरची हे एक अतूट समीकरण आहे. साधारणत: सर्वाधिक भाज्यांच्या फोडणीसाठी मिरचीचा वापर होतो. एक वेळ फोडणीतून कांदा वगळता येतो मात्र मिरची वगळणे तसे अशक्य असते. मिरची व इतर भाज्यांच्या झालेल्या भाववाढीचा मोठा फटका  मध्यमवर्गीयांच्या बजेटवर होणार आहे.