पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने ट्विट केलेल्या टूलकिट प्रकरणी दिल्ली पोलिसांनी कारवाई सुरू केली असून, दिशा रवीनंतर आणखी दोन जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी केलं आहे. यात मुंबईतील वकील निकीता जेकब यांच्याबरोबरच बीड जिल्ह्यातील असलेल्या शंतनू मुळूक यांचाही समावेश आहे. याप्रकरणात पोलिसांनी शंतनू यांच्या घराची झाडाझडती घेतल्याची माहिती समोर आली असून, त्यांच्या कुटुंबीयांकडे त्याचबद्दल पोलिसांनी चौकशी केली आहे. त्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे.

मूळचे बीड जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या शंतनू मुळूक यांचं नावही टूलकिट प्रकरणात समोर आलं आहे. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलनं बंगळुरूतून दिशा रवी या कार्यकर्तीला अटक केल्यानंतर निकीता जेकब आणि शंतनू यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केलं आहे. दोघांवर टूलकिट तयार केल्याचा आरोप आहे. मागील दोन दिवसांपासून दिल्ली पोलिसांची एक टीम शंतनूच्या कुटुंबियांची चौकशी करत असल्याचं वृत्त आता समोर आलं आहे.

शंतनूच्या बँक खात्याची माहिती पोलिसांनी मागितली असून, त्यांच्याविरुद्ध टूलकिट प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी ‘आजतक’ वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. मुळूक कुटुंबात शंतनू सर्वात मोठे आहेत. ते पेशाने अभियंता असून, त्यांनी अमेरिकेतून एमएससी पदवी घेतली आहे.

आणखी वाचा- देशात ज्या २१ वर्षाच्या मुलीची चर्चा आहे, ती दिशा रवी कोण आहे?

शेतकरी आणि पर्यावरणाविषयी शंतनू संवेदनशील आहे. शंतनू हे राष्ट्रीय स्तरावर पर्यावरणासाठी काम करतात. मागील एका आठवड्यांपासून शंतनू आणि कुटुंबियांचं बोलणं झालेलं नाही. त्यांचा कुटुंबियांशी कोणताही संपर्क नाही. शंतनू हे औरंगाबाद शहरात कामाला आहेत. काही कामानिमित्ताने ते पुण्याला गेले होते. त्यानंतर कुटुंबियांशी त्यांचा कोणताही संपर्क झालेला नाही.

आणखी वाचा- “निकिता जेकब, दिशा रवी, शांतनु यांनी ‘टूलकिट’ तयार केले, आणि…”

शंतनू यांनी दिल्ली पोलिसांच्या अटक वॉरंटविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंठपीठात याचिका दाखल केलेली आहे. सतेज जाधा हे त्यांची बाजू मांडणार आहेत. दरम्यान, बीडमधील त्यांच्या घरी पोलीस नजर ठेवून आहेत. शंतनू यांच्यावर टूलकिट तयार करण्याबरोबरच खलिस्तानवादी समर्थक गटाच्या संपर्कात असल्याचा आरोप आहे.