रवींद्र केसकर

‘‘पावसानं सगळा शिवार नासवला. दिवसागणिक कर्जाचा डोंगर वाढतंय. घरात वयात आलेल्या दोन पोरी. या उपवर मुलींचे हात पिवळं करावं म्हणतोय, पण उत्पन्नच हाती लागलं नाही. मुलींचं लग्न नव्हं, जगणंच अवघड झालंय..’’ ७० वर्षीय शेतकरी तुकाराम भोंडवे यांनी आपल्या वेदनेला वाट मोकळी करून दिली. भोंडवे हे लोहारा तालुक्यातील मोघा खुर्द येथील रहिवासी आहेत.

तुळशीच्या लग्नासमयी होणारी फटाक्यांची आतषबाजी लग्नसमारंभाची वर्दी देतात. हीच फटाक्यांची आतषबाजी शेतकऱ्यांच्या घरातील उपवर मुलींच्या पित्यांसाठी चिता पेटवणारी ठरत आहेत. परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या हाती एकही पीक आले नसल्याने तुकाराम भोंडवे यांच्यासारख्या अनेक शेतक ऱ्यांच्या घरातील वयात आलेल्या मुलींच्या लग्नाचा प्रश्न उभा राहिला आहे.

लोहारा तालुका कृष्णा व गोदावरी खोऱ्यांच्या सीमेवर वसलेला तालुका आहे. पडलेल्या पावसाचा प्रत्येक थेंब वाहून जातो. येथे सिंचनाची फारसी सोय नाही. त्यामुळे पावसाच्या पाण्यावरच शेती कसली जाते. मोठे उद्योग-धंदे नसल्याने शेती व्यवसायावरच उपजीविका भागवावी लागते. परंतु पावसाचे प्रमाण अत्यल्प झाल्याने मागील पाच-सहा वर्षांपासून तालुक्याला दुष्काळाशी सामना करावा लागत आहे.

यंदा दीड महिन्यानंतर उशिरा पाऊस झाला असतानाही मागच्या वर्षांचे कर्जाचे ओझे चालू वर्षांत फेडून चार पसे शिल्लक ठेवता येईल, या अपेक्षेने तालुक्यातील बळिराजाने कधी नव्हे ती पहिल्यांदा मोठ्या जिद्दीने १०२ टक्के खरिपाची पेरणी केली. तुरळक पावसावर पिके जोमात आली. त्यामुळे उत्पादनाची मोठी आशा असतानाच परतीच्या पावसाने हाहाकार माजवला. अतिवृष्टी व त्यानंतर सलग एक महिना पाऊस झाल्यामुळे हातातोंडाला आलेल्या खरीप पिकांची प्रचंड नासाडी झाली. कांदा, सोयाबीन, द्राक्ष, डाळिंब बागांना याचा मोठा फटका बसला आहे. तालुक्यातील जवळपास ८० टक्के क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाने बळिराजाचे पार कंबरडेच मोडले आहे.

मोघा (खुर्द) येथील शेतकरी तुकाराम भोंडवे यांना सहा मुली आहेत. चार मुलींचे लग्न झाली आहेत. दोन मुली उपवर झाल्या आहेत. त्यातील एक अपंग मुलगी आहे. घरात कर्ता पुरुष एकटाच असल्याने आपल्या पाच एकर शेतात रात्रंदिवस राबून तुकाराम भोंडवे घरप्रपंच चालवतात.

यंदा तीन एकरमध्ये सोयाबीन तर एक एकरमध्ये उडीद, कांदा व उसाची लागवड केली आहे. आतापर्यंत शेतात एकूण ६० हजार रुपये खर्च केले. मात्र परतीच्या पावसाने सोयाबीन व कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाच्या माऱ्याने ऊस आडवा पडला आहे. सध्या शेतात गुडघाभर पाणी आणि चिखल आहे.

सोयाबीन व कांदा शेतात तसाच सडून गेला आहे. काढणीसाठी पसे नसल्याने पीक पूर्णत: नासून गेले. शेतात पाणी असल्यामुळे वापसा वेळेत होणार नसल्याने रब्बीच्या पेरणीची आशाही मावळली आहे. रब्बी पेरणीचे नक्षत्र गेल्याने उशिरा पेरणी केल्यास ते हाती लागेल की, नाही याची शाश्वती नाही, असे भोंडवे सांगतात.

संकटांशी सामना कुठवर करायचा?

शेतीच्या भरवशावर मागील वर्षी हातउसने आणि बँकेचे कर्ज काढून एका पोरीचे लग्न करून दिले. लग्नासाठी घेतलेले कर्ज यंदाच्या हंगामात फेडून शिल्लक राहिलेल्या पशातून दुसऱ्या पोरीचे लग्न उरकून टाकावे, असे नियोजन आखले होते. परंतु पावसाने होत्याचे नव्हते करून टाकले. एक पोरगी तालुक्याच्या कॉलेजात चौदावीत शिक्षण घेत आहे. त्यांच्या शिक्षणाचा आणि घरप्रपंचाचा खर्च अशा संकटात कसा चालवायचा, काहीही कळेना हे पाणावलेल्या डोळ्यांनी शेतकरी तुकाराम भोंडवे सांगत होते.