हरभरा डाळ, रवा, मदा, खोबऱ्याचे दर उतरले; साखर स्वस्त

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सरकारची धरसोडीची धोरणे, चलन निश्चलनीकरणाचा कित्येक  महिने ग्रामीण आणि शहरी भागाला पोहोचलेला तडाखा आणि वस्तू-सेवा कराची अंगावर आलेली जटिल प्रक्रिया यांतून बडय़ा-छोटय़ा उद्योगांवर अर्थग्रहण लागले असतानाच राज्यातील घाऊक आणि किरकोळ किराणा व्यापारही मंदावला आहे. लोकांच्या क्रयशक्तीत घट झाल्यासारखे चित्र यंदा दिसत असून दिवाळी जवळ आली तरी मालाला उठाव नसल्यामुळे हरभरा डाळ, रवा, मदा, खोबरे यांच्या दरात घसरण झाली आहे. साखर, तेलाचे दरही मागणीअभावी खाली आले आहेत. सर्वत्र असलेल्या मंदीचा हा परिणाम असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

दसऱ्यानंतर बाजाराला दिवाळीची चाहूल लागते. अगदी घरातील वाण सामानापासून ते तयार कपडे, दागिने, मोठय़ा वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी दिसते. पण यंदा दिवाळी जवळ आली, पगार झाला, तरीही बाजारात अद्याप दिवाळीचे वातावरणच दिसत नाही. या साऱ्यांमागे सर्वत्र असलेल्या मंदीकडे बोट दाखवले जात आहे. दागिने किंवा अन्य महागडय़ा वस्तू तर दूरच पण या उत्सवासाठी लागणाऱ्या किमान वाण सामानालाही यंदा म्हणावा असा उठाव नसल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. या साऱ्याचा परिणाम वाण सामानाचे दर कोसळण्यात झाला आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत..

दिवाळीत साधारणपणे हरभरा डाळ, रवा, मदा, खोबरे, साखर आणि तेल या पदार्थाना मोठी मागणी असते. पण या सर्व पदार्थाच्या दरामध्ये सध्या घसरण सुरू आहे. हरभरा डाळीचे ठोक खरेदीचे दर क्विंटलला ७ हजार ६०० ते ७ हजार ८०० रुपयांवर गेले होते. ते ७ हजार १०० ते ७ हजार २०० रुपयांवर आले आहेत. गेल्या वर्षी हरभरा डाळीचा दर १४० रुपये किलोच्या घरात होता. गतवर्षीच्या तुलनेत हरभरा डाळीचा यंदाचा दर निम्म्यावर आहे. तर गोटा खोबऱ्याचा दर किलोला १०० वरून १७० रुपयांवर गेला होता. हाच दर सध्या १४० रुपये किलोवर आला आहे.

रवा, साखर घसरली

रवा-मदाच्या दरातही घसरण सुरू आहे. ७० किलोच्या प्रमाणात विकल्या जाणाऱ्या रव्याचा दर १२५० वरून १ हजार १६० रुपये तर मैद्याचा दर १२०० रुपयांवरून १ हजार ६० रुपयांवर खाली आला आहे. खाद्यतेलाचे दर स्थिर असले तरी त्यालाही उठाव नसल्याने त्याच्या दरातही किंचित घसरण झाली असल्याचे तेलाचे ठोक विक्रेते गजानन कुल्लोळी यांनी सांगितले. दुसरीकडे साखरेच्या दरातही क्विंटलला दीडशे रुपयांनी घसरण झाली आहे.

व्यापारी चक्रावले

ऐन दिवाळीत या उत्सवासाठी सर्वाधिक लागणाऱ्या या जिन्नसांना सध्या मागणी नसल्याने व्यापारीदेखील चक्रावले आहेत. खरेतर या पदार्थाची खरेदी दिवाळीपूर्वी १५ दिवस अगोदरच सुरू होत असते, पण त्यांना अद्याप म्हणावी अशी मागणी नसल्याचे सांगली बाजारपेठेतील प्रसिद्ध घाऊक व्यापारी विवेक शेटे यांनी सांगितले. या साऱ्यांमागे सर्वत्र जाणवणारी औद्योगिक मंदी, शेती मालाचे कोसळलेले दर, सुरुवातीच्या टप्प्यात पावसाअभावी खरिपाचे झालेले मोठे नुकसान आदी कारणे सांगितली जात आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Grocery market have been falling due to government flop policy
First published on: 06-10-2017 at 01:07 IST