प्रशांत देशमुख

वर्धा : पिपरी येथील नवरदेवाच्या आईचा व पत्नीचा करोना अहवाल सकारात्मक आल्यानंतर आज दुपारी नवरदेवाच्या मामाच्या मुलांचा अहवाल सकारात्मकच आल्याने धास्तावलेल्या प्रशासनाने वर्धा शहर व लगतच्या तेरा गावात संचारबंदी लागू केली. पिपरी येथील शिवराम वाडीतल्या युवकाचे ३० जून रोजी लग्न झाले होते. या युवकाची प्रकृती बिघडल्याने त्याला उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र ५ जुलैला नवरदेव करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्यावर वऱ्हाडी मंडळीत तसेच पिपरीत कल्लोळ उडाला.

आज सकाळच्या अहवालात नवरदेवाची आई व पत्नी तसेच दुपारी आलेल्या अहवालात नवरदेवाच्या मामाचा मुलगा (१८) व मुलगी (१३) करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. मामाचा परिवार शहरातील इतवारा परिसरात राहतो. हा परिसर दुपारी प्रतिबंधीत करण्यात आला. लग्नात मर्यादेपेक्षा अधिक संख्येने वऱ्हाडी उपस्थित असल्याची चर्चा होत आहे. तसेच नागपूर, यवतमाळ, अमरावती येथूनसुध्दा बरेच पाहुणे आले होते. या जवळच्या नातलगांना विलगीकरणात ठेवण्यात आले असून अन्य वऱ्हाड्यांचा शोध घेतला जातो आहे. हा विवाह शहरासाठी करोना बॉम्ब तर ठरणार नाही ना, अशी चर्चा आता होते आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आज रात्री आठ वाजेपासून पुढील तीन दिवस म्हणजे १३ जुलैच्या रात्री १२ पर्यत संचारबंदी घोषीत केली आहे.

वर्धा शहर तसेच सावंगी, पिपरी, उमरी, सिंदी, बोरगाव, म्हसाळा, सातोडा, नालवाडी व नटाळा या ग्रामपंचायत परिसरात संचारबंदी लागू राहील. केवळ औषधी दुकाने, दवाखाने, दूध, वर्तमानपत्र वाटप, अत्यावश्यक शासकीय कार्यालय चालू राहतील.