15 October 2019

News Flash

रत्नागिरी जिल्ह्य़ात यंदा भूजल पातळी चिंताजनक

रत्नागिरी जिल्ह्य़ातील पावसाची वार्षिक सरासरी सुमारे ३३०० मिलिमीटर आहे.

राज्याच्या अन्य भागांप्रमाणे कोकणातही गेल्या मोसमात पावसाचे प्रमाण घटल्यामुळे गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत भूजलाची पातळी आणखी कमी झाली आहे.

मार्चअखेर जिल्ह्य़ातील नऊ तालुक्यांमधील भूजल पातळीची आकडेवारी पुढीलप्रमाणे – मंडणगड ३.४० मीटर (गेल्या पाच वर्षांतील सरासरी ३.३४ मीटर), दापोली ४.६१ मी. (४.५१), खेड ४.०५ मी. (३.८९), गुहागर ७.९४ मी. (७.८३), चिपळूण ४.८१ मी. (४.७५), संगमेश्वर ७.०९ मी. (६.९६), रत्नागिरी ९.५१ मी. (९.१२), लांजा ८.७७ मी. (८.७१), राजापूर ६.६४ मी. (६.३२). याचबरोबर मार्च २०१५ च्या तुलनेतही या सर्व तालुक्यांमध्ये भूजल पातळी आणखी खाली गेली आहे. गेल्या वर्षी मार्चअखेर या तालुक्यांची नोंदवण्यात आलेली  पातळी पुढीलप्रमाणे – मंडणगड ३.३८ मीटर, दापोली ४.५५ मी., खेड ३.९१मी., गुहागर ७.८५ मी., चिपळूण ४.६६ मी., संगमेश्वर ६.८९ मी., रत्नागिरी ९.०९ मी., लांजा ८.४३ मी., राजापूर ६.३३ मी.

रत्नागिरी जिल्ह्य़ातील पावसाची वार्षिक सरासरी सुमारे ३३०० मिलिमीटर आहे. पण गेल्या हंगामात जिल्ह्य़ात एकूण सरासरी फक्त सुमारे २५०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याचप्रमाणे सप्टेंबर महिन्यानंतर दिवाळी किंवा नोव्हेंबर-डिसेंबरात फारसा पाऊस झाला नाही. त्यामुळे भूजल पातळीमध्ये सातत्याने घट होत राहिली. गेल्या महिन्यापासून जिल्ह्य़ात उन्हाळाही तीव्र होऊ लागला आहे. त्यामुळे पाणीसाठय़ांचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. तसेच भूजल पातळीही खालावत गेली आहे. जिल्ह्य़ातील खेड आणि लांजा तालुक्यात टॅंकरव्दारे पाणीपुरवठा यापूर्वीच सुरू झाला आहे. पावसाळ्याला अजून दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी आहे. त्यामुळे या काळात पाणीटंचाई आणखी गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे.

First Published on April 6, 2016 2:15 am

Web Title: groundwater level low in ratnagiri
टॅग Ratnagiri