21 January 2021

News Flash

समाधानकारक पर्जन्यमानानंतरही भूजल पातळी खालावलेली

भूजल पातळी वाढविण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

भूजल पातळी वाढविण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

प्रसेनजीत इंगळे, लोकसत्ता

विरार :  यंदा वसई-विरार परिसरामध्ये समाधानकारक पाऊस पडला असली तरी भूजल पातळी कमीच आहे. वैज्ञानिक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार वाढते शहरीकरण आणि जिल्ह्याच्या भौगोलिक संरचनेमुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढत नाही. यासाठी कोणत्याही उपाययोजना राबविल्या जात नसल्याने भविष्यात वसई तथा पालघर जिल्ह्याला पाणी संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

वसई-विरार शहरात ३१ ऑगस्ट पर्यंत २४३२ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या वसईतील सर्वच जलस्रोत पूर्णत: भरले आहेत. असे असतानाही दुसरीकडे मागील पाच वर्षांपासून वसई-विरार तथा पालघर जिल्ह्यातील भूजल पातळी मात्र दरवर्षी कमी होत आहे. ऑक्टोबर २०१९ च्या भूजल सर्वेक्षण आणि विकास योजना पालघर यांच्या सर्वेक्षणानुसार मागील पाच वर्षांत वसई तालुक्याच्या भूजल पातळीत सरासरीपेक्षा ०.५९  मीटरची घट आली आहे. ही घट सातत्याने वाढली जात आहे. केवळ पावसाळ्यात पाणी पातळी वाढली जाते. पण जमिनीत पाणी मुरून साठवण्याची कोणतीही यंत्रणा कार्यरत नसल्याने येणाऱ्या काळात पाणी कमी पडणार आहे.

वसई-विरार परिसरात इतर वेळी पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. कूपनलिका, विहिरी व बावखळ, शेततळे यांच्यातून पाण्याचा बेसुमार उपसा केला जात असल्याने वसई-विरार परिसरातील भूजल पातळी खालावली आहे. त्याचबरोबर मोठय़ा प्रमाणात वाढत असलेली बांधकामे आणि वाढती वृक्षतोड, बोडके होणारे डोंगर यामुळे जमिनीची धूप मोठय़ा प्रमाणत होऊन जमिनीची आद्र्रता कमी होत असल्याने पाण्याचे बाष्पीभवन होऊन जमिनीचा जलस्तर कमी होत आहे.

वसईत साधारणत: दीड कोटी लिटर पाण्याचा उपसा केवळ टँकरवाले करत असल्याची पर्यावरण संवर्धन समितीचे समन्वयक समीर वर्तक यांनी दिली आहे. महापालिका तलाव सुशोभिकरणाच्या नावाखाली तलावाला सिमेंटच्या भिंती बांधत असल्याने तलावाचे झरे नष्ट होत आहेत, आणि लोकांनी पिण्याच्या पाण्यासाठी घरात लावलेले वॉटर प्युरिफायर (पाणी शुद्धीकरण यंत्र) यामुळे दोन तृतीयांश पाणी वाया जाते, यामुळे पाण्याचा वापर वाढला आहे.

समाधानकारक पाऊस पडला असला तरी भौगोलिकदृष्टय़ा जमिनीचे भूस्तर हे खडकाळ असल्याने पाणी जमिनीत थांबत नाही. यासाठी भूस्तराची पाहणी करून रिचार्ज शाफ्टची निर्मिती करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पाण्याचा उपसा नियंत्रणात आणला पाहिजे. बोअरवेलला परवानगी बंद केल्या पाहिजे.

– प्रमोद पोळ,  पालघर प्रभारी वरिष्ठ भू-वैज्ञानिक

वसई-विरार महानगरपालिका रिचार्ज शाफ्टचे काम हाती घेणार आहे, यासाठी आमची भू-वैज्ञानिक यांच्याबरोबर चर्चा सुरू आहे. पावसाळ्यानंतर या कामाला सुरुवात केली जाईल

– गंगाथरन डी., आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका

मागील ३० वर्षांत प्रशासनाने जलसंवर्धनासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. पाणी माफिया दिवसेंदिवस जमिनीतून लाखो लिटर पाणी उपसा करत आहेत. यामुळे येणाऱ्या काळात वसईवर जलसंकट कोसळणार आहे.

– समीर वर्तक, पर्यावरण संवर्धन समिती, वसई

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 4:02 am

Web Title: groundwater level lowered even after satisfactory rainfall zws 70
Next Stories
1 पाच महिन्यांत ५९ हजार किलो जैविक कचऱ्याची विल्हेवाट
2 ‘टोसिलीझुमॅब’चा काळाबाजार
3 करोना केंद्रात जेवण पोहोचविण्यासाठी पालिकेकडून अधिकारी नियुक्त
Just Now!
X