07 December 2019

News Flash

१०० गावांमध्ये ‘समूह गृहनिर्माण’ योजना

या महामंडळाला  पाच लाख परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

मुंबई : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत राज्यभरात मोठय़ा प्रमाणात घरांच्या निर्मितीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाकडून डिसेंबर २०१९ पर्यंत पाच लाख घरांच्या प्रकल्पांना मान्यता देण्यात येणार असून १०० गावांमध्ये समूह गृहनिर्माण प्रकल्प राबवून ‘स्मार्ट व्हिलेज’ साकारण्यात येणार आहेत, अशी माहिती महामंडळाचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सर्वासाठी घरे-२०२२’ या संकल्पनेतून ‘प्रधानमंत्री आवास योजना-सर्वासाठी घरे (शहरी)’ ही योजना राबविण्यात येत आहे. त्यातून महाराष्ट्रासाठी १९.४० लाख घरांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या योजनेला गती देण्याच्या उद्देशाने राज्यात डिसेंबर २०१८ मध्ये महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ स्थापन करण्यात आले. या महामंडळाला  पाच लाख परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. महामंडळाने नुकतेच पुणे येथे १० हजार घरांच्या आणि भुसावळ (जि. जळगाव) येथे पाच हजार घरांच्या प्रकल्पाला मान्यता दिली असून सोलापूर येथे ११ हजार घरांच्या प्रकल्पाला या महिन्यात मान्यता देण्यात येईल, असे मिरगणे यांनी सांगितले.

‘स्मार्ट व्हिलेज’साठी समूह गृहनिर्माण

पंडित दीनदयाळ उपाध्याय आवास योजनेसाठी पात्र लाभार्थीना ग्रामविकास विभागाकडून प्राप्त होणाऱ्या ५० हजार रुपयांच्या अनुदानातून महामंडळातर्फे जमीन खरेदी करून विकसित करण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. या योजनेसाठी महामंडळ समन्वय संस्था म्हणून काम करणार आहे. या योजनेमध्ये गावातील पात्र लाभार्थीची संख्या लक्षात घेऊन तेवढय़ा आवश्यकतेचा भूखंड गावाशेजारीच अनुदानाच्या रकमेतून महामंडळ विकत घेईल. गावातील लाभार्थीनी तयार केलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थेला हा भूखंड देण्यात येईल. गृहनिर्माण संस्थेचे सदस्य नसलेल्या पात्र लाभार्थीनाही वैयक्तिक भूखंड देण्यात येणार आहेत, अशी माहिती मिरगणे यांनी दिली.

First Published on August 15, 2019 4:54 am

Web Title: group housing scheme in 100 villages zws 70
Just Now!
X