सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघातील काँग्रेसचे तगडे उमेदवार, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचार यंत्रणेत दक्षिण सोलापूर तालुक्यात गोंधळाची स्थिती असून, यात गटातटाच्या राजकारणाचा फटका पक्षाला बसू लागल्याचे सांगितले जाते. त्यामुळे प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात स्वत: शिंदे यांनीच या भागातील प्रचार यंत्रणा ताब्यात घेण्याचा विचार करीत असल्याचे त्यांच्या निकटच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
दक्षिण सोलापूरचे काँग्रेसचे आमदार दिलीप माने व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून ‘शीतयुद्ध’ सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शेळके हे इच्छुक असून त्यांनी तशी जोरदार तयारी सुरू केली आहे. धनगर समाजाचे शेळके हे माजी मंत्री आनंदराव देवकते यांचे जावई आहेत. यापूर्वी देवकते यांचे दक्षिण सोलापूर तालुक्यात वर्चस्व होते. अनेक वर्षांपासून या भागातून विधानसभेवर प्रतिनिधित्व करणारे देवकते यांनी २००३ साली सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्यासाठी आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्याच सुमारास देवकते यांना सोलापूर लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने संधी दिली खरी; परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर देवकते यांची राजकीय पीछेहाट होत गेली. या पाश्र्वभूमीवर त्यांचे वारसदार म्हणून बाळासाहेब शेळके यांना पक्षाचे जिल्हाध्यक्षपद सांभाळताना विधानसभेचे वेध लागले. यातूनच विद्यमान आमदार दिलीप माने व शेळके यांच्यात शीतयुद्ध सध्या लोकसभा निवडणुकीत पत्राची प्रचार यंत्रणा राबवताना उफाळून आल्याचे बोलले जाते.
शेळके यांनी आमदार माने यांचे विरोधक राष्ट्रवादीचे सुरेश हसापुरे व काँग्रेसचे राजशेखर शिवदारे व इतरांना एकत्र आणले असून सुशीलकुमार शिंदे यांनीही शेळके यांच्यावर प्रचार यंत्रणा सोपविली आहे. त्यामुळे आमदार माने यांचा गट अस्वस्थ झाला असून याबद्दलची तक्रार त्यांच्या काही अनुयायांनी सुशीलकुमारांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे यांच्याकडे केली. नंतर ही भावना थेट सुशीलकुमारांपर्यंत पोहोचली. परंतु त्याची दखल शिंदे यांनी घेतली नसल्याचे सांगण्यात आले. सध्या तरी आमदार माने व शेळके हे स्वतंत्रपणे प्रचार यंत्रणा राबवताना एकमेकांवर कुरघोडय़ा करण्याची संधी सोडत नसल्याचे मानले जाते. ‘अर्थ’पूर्ण कारणामुळे प्रचार यंत्रणा कोणाच्या ताब्यात असावी, हे महत्त्वाचे मानले जाते.
याच तालुक्यातील बोरामणी, वळसंग, कुंभारी, तांदूळवाडी आदी भाग अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात येतो. या ठिकाणी काँग्रेसचे माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्याशी जिल्हा परिषद सदस्य उमाकांत राठोड यांनी चांगलाच पंगा घेतला आहे. बंजारा समाजात प्रभाव असलेल्या राठोड हे पाणीप्रश्नावर पक्ष बाजूला ठेवून सातत्याने चळवळ करतात. लढाऊ तथा आक्रमक कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जातात. लोकसभा निवडणुकीत म्हेत्रे यांच्यासोबत प्रचार यंत्रणेत सहभागी होण्यास त्यांनी नकार दिला आहे. राठोड यांचे म्हेत्रे यांचे विरोधक भाजपचे आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत.