परस्परांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न

जिल्ह्य़ात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू असली तरी २०१९ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण आतापासूनच तापायला सुरुवात झाली आहे. अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधल्याने पक्षांतर्गत गटबाजी वाढत आहे. घाऊक भरती करणाऱ्या भाजपमध्ये त्याचे प्रमाण अर्थातच अधिक आहे. जिल्ह्य़ातील दोन विद्यमान खासदारांचे तिकीट कापण्यासाठी भाजपमधील एक गट सक्रिय झाल्याने आतापासून शह-काटशहाचे राजकारण रंगत आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा विक्रमी मताधिक्याने निवडून आलेले विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांचा पत्ता कापण्यासाठी भाजपमधील एक गट सक्रिय झाला आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गेल्या महिन्यात एका सभेत या मतदारसंघातून ए. टी. पाटीलच पुन्हा उमेदवार असतील, असे भाकीत वर्तविल्यानंतर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या गटाचे मानले जाणारे भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी पत्रकार परिषद घेत या लोकसभा मतदारसंघातून स्वत: इच्छुक असल्याचे जाहीर केले. शिस्तीचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपमध्ये जिल्हाध्यक्षाने पक्षाच्या खासदाराविरुद्ध केलेल्या या जाहीर वक्तव्याचे अनेक अर्थ लावले जात आहेत. याच मतदारसंघातून इच्छुक असलेले शिवसेनेचे माजी आमदार आर. ओ. पाटील यांच्या वाढदिवशी झळकलेल्या फलकांवर संसदेचे छायाचित्र वापरण्यात आले आहे.

भाजप व शिवसेनेमधील ताणले गेलेले संबंध पाहता आगामी लोकसभा निवडणूक विधानसभेप्रमाणेच स्वतंत्र लढवली जाण्याची शक्यता आहे. संसदेवर जाण्याची इच्छा आर. ओ. पाटील यांनी कधीही लपवून ठेवली नाही. या लोकसभा मतदारसंघात पाचोरा, भडगाव, पारोळा, एरंडोल, धरणगाव, जळगाव येथे शिवसेनेची ताकद आहे. यामुळे आर. ओ. पाटील कमालीचे सक्रिय झाले आहेत. या मतदारसंघातून राष्ट्रवादी माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या नावाचा विचार करीत होती. मात्र त्यांची भाजपशी जवळीक वाढल्याने राष्ट्रवादीचे दरवाजे त्यांना बंद झाल्यात जमा आहे. राष्ट्रवादीत साहेबांच्या आदेशानुसार अनेक इच्छुक कामाला लागले असले तरी तुल्यबळ उमेदवार म्हणून आमदार डॉ. सतीश पाटील यांच्याकडे पाहिले जात आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. सलग दोन वेळा निवडून आलेले हरिभाऊ  जावळे यांचे चालू पंचवार्षिकमध्ये तिकीट कापून रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली गेली होती. त्या निवडूनही आल्या, मात्र आता खडसे-महाजन गटातील वादामुळे येथून पुन्हा जावळेंना संधी मिळण्याची पक्ष वर्तुळात चर्चा आहे. या भागात खडसे गटाचे खच्चीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत कोणताही नेता जाहीर भाष्य करत नसला तरी रावेर लोकसभा मतदारसंघात गटबाजी उफाळून येण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसचे नेते डॉ. उल्हास पाटील यांनीही गेल्या वेळीप्रमाणे अपक्ष उमेदवारीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. शिवसेना जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे दौरे वाढल्याचे दिसत आहे. या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर, रावेर लोकसभा मतदारसंघात शह-काटशहाचे राजकारण रंगणार असल्याचे चिन्ह आहे.

गेल्या वर्षी विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत खडसे समर्थक जगवानी यांचा पत्ता कापण्यात आला होता. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्यात महत्त्वाची कामगिरी बजाविली होती आणि त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साथ लाभली होती. यामुळेच कोणाचा पत्ता कधी कापला जाईल, अशी पक्षात चर्चा आहे.

जिल्हाध्यक्षांना दणका

जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी केलेल्या नियुक्त्या वादग्रस्त ठरल्याने प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी या नियुक्त्या रद्द केल्या आहेत. जिल्ह्य़ातील पक्षांतर्गत वादातून हा प्रकार घडला आहे.