पालकमंत्र्यांना पर्याय निर्माण करण्याचाही प्रयत्न

सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर सोलापूर जिल्ह्य़ात सत्ताधारी भाजपअंतर्गत पालकमंत्री विजय देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यातील शह-काटशहाचे राजकारण थांबायला तयार नाही, तर उलट केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्या सोलापूर भेटीप्रसंगी या गटबाजीचे प्रदर्शन घडविण्यात आले. यात पालकमंत्री विजय देशमुख यांना वीरशैव लिंगायत समाजातून पर्याय उभा करण्याचेही डावपेच सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या गटाकडून आखले जात असल्याचे चित्र समोर आले आहे.

काल गुरुवारी नितीन गडकरी हे सोलापुरात आले होते. त्यांची ही सोलापूर भेट पूर्वनियोजित असतानाही त्यांच्या भेटीप्रसंगी पालकमंत्री विजय देशमुख हे सोलापुरात थांबले नव्हते. केवळ विमानतऴावर गडकरी यांचे स्वागत केल्यानंतर ते कोठेही दिसले नाहीत. गडकरी हे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे ‘गॉडफादर’ मानले जातात. दोन्ही देशमुखांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर शीतयुध्द कायम असल्याचे दिसून येते. एकमेकांना अडचणीत आणण्याची संधी साधण्याचे राजकारण खेळताना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधून आजी-माजी आमदारांना भाजपमध्ये आणण्याच्या मुद्यावरही त्यांच्यात टोकाचे मतभेद निर्माण झाल्याचे राजकीय हालचालीवरून पाहावयास मिळते. यात पालकमंत्री विजय देशमुख यांच्या पुढाकारातून अक्कलकोटचे काँग्रेसचे आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांच्या भाजप प्रवेशाच्या हालचाली जोर धरत असताना त्यास पक्षातील ‘निष्ठावंतां’चा मुद्दा पुढे रेटून ‘खो’ घालण्याचा प्रयत्न सुभाष देशमुख यांना मानणाऱ्या गटाकडून उघडपणे होत आहे. यात माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनीही पालकमंत्री देशमुख यांच्या विरोधात उघडपणे भूमिका घेत त्यांच्यावर ‘सोनेरी टोळी’ चालवित असल्याचा आरोपही केला आहे.

या राजकीय चिखलफेकीच्या पाश्र्वभूमीवर काल गुरुवारी नितीन गडकरी यांच्या सोलापूर दौऱ्यात त्यांच्या स्वागतापासून त्यांच्या कार्यक्रमापर्यंत पालकमंत्री गटाचा एकही अनुयायी फिरकला नाही. पालकमंत्री गटाचे मानले जाणारे भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख, उपमहापौर शशिकला बत्तुल, महापालिका सभागृहनेते संजय कोळी आदी कोणीही गडकरी यांच्या दौऱ्यात फिरकले नाहीत. यात कोणताही राजशिष्टाचार पाळला गेला नाही. तर याउलट, दुसरीकडे गडकरी यांच्या दौऱ्यावर सहकारमंत्री सुभाष देशमुख व त्यांच्या समर्थकांची छाप होती. यात विद्यापीठाच्या कार्यक्रमात गडकरी यांना अचानकपणे थकवा जाणवला तेव्हा पुढील कार्यक्रम रद्द करून नागपूरला जाण्यापूर्वी ते सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी काही वेळ थांबले होते.

नेमक्या याचवेळी गडकरी यांच्या  हस्ते महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे नवनिर्वाचित सदस्य अ‍ॅड. मिलिंद थोबडे यांचा सत्कार गडकरी यांच्या हस्ते घडवून आणला गेला. अ‍ॅड. मिलिंद थोबडे हे सोलापुरातील लिंगायत समाजातील उच्चभ्रू, प्रतिष्ठित थोबडे घराण्याचे आहेत. त्यांनी सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपने संधी दिल्यास उभे राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. हा मतदारसंघ पालकमंत्री विजय देशमुख यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.