कर्जमाफीसाठी बीडमध्ये धरणे    

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आणि खरीप हंगामासाठी मोफत खते, बियाणे द्यावे, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तहसील कार्यालयांवर धरणे आंदोलन करीत पक्षाची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. परळीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री प्रकाश सोळंके, सुरेश धस यांच्यासह प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकत्रे रस्त्यावर उतरले. सरकारविरुद्ध आंदोलन करतानाही पक्षांतर्गत गटबाजी अंबाजोगाई व बीडमध्ये ठळकपणे दिसून आली.

सरकारविरुद्ध वातावरण तापवण्यासाठी, तसेच शेतकऱ्यांच्या मागण्या ऐरणीवर आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यात मंगळवारी तहसील कार्यालयांवर धरणे आंदोलन केले. जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी बीड तहसीलसमोर शहरातील नगरसेवक व काही कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन करून सरकारवर टीका केली. सरकार संवेदनशील नाही. शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, पेरणीसाठी मोफत बियाणे द्यावे, विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करावे, पीकविम्याची रक्कम तत्काळ द्यावी अशी मागणी त्यांनी केली. परळीत धनंजय मुंडे यांनी तहसील कार्यालयासमोर जोरदार शक्तिप्रदर्शन करीत धरणे आंदोलन केले. मुंडे म्हणाले, की शेतकऱ्यांना न्याय मिळावा या साठी आंदोलने करण्यात येत असून राज्य सरकारने कर्जमाफीचा तत्काळ निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

माजलगावमध्ये माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी तहसीलसमोर ठिय्या देऊन सरकारवर टीका केली. अंबाजोगाईत माजी आमदार पृथ्वीराज साठे, अक्षय मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र आंदोलने झाली.

शिरूरमध्ये राष्ट्रवादी युवा नेते जयदत्त धस, तर धारूरमध्ये युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जयसिंह सोळंके यांनी धरणे धरून शेतकऱ्यांच्या मागण्या तत्काळ मान्य करण्याची मागणी केली. पाटोदा तहसीलसमोर जि.प.चे सभापती महेंद्र गर्जे, देवीदास धस आदींच्या उपस्थितीत धरणे आंदोलन झाले. आष्टीत माजी मंत्री सुरेश धस, तर वडवणीत तालुकाध्यक्ष दिनेश मस्के, भारत जगताप यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. जिल्हाभर राष्ट्रवादीचे कार्यकत्रे आक्रमकपणे सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरले.

आंदोलनातही पक्षांतर्गत गटबाजी

१५ वर्षांच्या सत्तेनंतर दीड वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते विरोधी पक्षाच्या भूमिकेत आले. पक्ष नेतृत्वाने संघटन मजबूत करण्यासाठी सरकारविरुद्ध आंदोलनाचा आदेश दिल्यानंतर सर्व नेते समर्थकांसह रस्त्यावर आले, तरी अंतर्गत गटबाजी मात्र लपून राहिली नाही. पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. क्षीरसागर यांनी बीड तहसीलसमोर धरणे आंदोलन केले. मात्र, या आंदोलनात जि.प. सभापती संदीप क्षीरसागर समर्थक एकही पदाधिकारी सहभागी नव्हता. अंबाजोगाईत माजी आमदार पृथ्वीराज साठे व अक्षय मुंदडा या दोघांनी स्वतंत्र तंबू टाकून आंदोलन केले. त्यामुळे आंदोलनातही पक्षांतर्गत गटबाजीचे प्रदर्शन दिसून आले.