नगर शहरातील वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय—थोरात

नगर : शहर व नगर तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या ही चिंताजनक आहे. प्रशासन प्रयत्न करत आहे, परंतु त्याला नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. करोनाची लक्षणे असणारे नागरिक घरातच थांबत आहेत. त्यांनी स्वत:ला कोविड केअर सेंटरमध्ये विलगीकरण करावे. शहरातील पदाधिकारी व नगरसेवक यांनी राजकारण बाजूला ठेवून प्रशासनाला मदत करावी. यामध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग आवश्यक आहे, असे अवाहान काँग्रेस नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज शनिवारी केले.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आज, शनिवारी नगरमध्ये होते. जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील आवाहन केले. यावेळी आ. लहू कानडे व आ. डॉ. सुधीर तांबे उपस्थित होते. थोरात म्हणाले, प्रशासन प्रयत्न करीत आहे मात्र तरीही जिल्ह्य़ातील करोनाबाधितांची रोजची संख्या ४ हजाराच्या आसपास कायम आहे. प्रशासनाला प्रयत्न करूनही यश मिळत नाही. यासंदर्भात जिल्‘ातील प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यासाठी अधिक बारकाईने सर्वेक्षण करण्याची आवश्यकता आहे. बाधित नागरिकांनी गृह विलगीकरणात न राहता स्वतंत्रपणे ‘कोविड केअर सेंटर‘मध्ये स्वत:चे विलगीकरण करावे. मध्यंतरी औषधांचा तुटवडा जाणवत होता. या संदर्भात आपण राज्यपातळीवर चर्चा केली. त्याचे चांगले परिणाम दिसत आहेत. तुटवडा कमी झाला आहे. प्राणवायू पुरवठय़ाची परिस्थिती सध्या ठीक आहे. परंतु बाधितांची संख्या कमी होत नाही, ही काळजीची घटना आहे. नगर शहर व नगर तालुक्यात रोज १ हजार ते १२०० रुग्ण आढळत आहेत. नगर शहरात जास्त लक्ष द्यावे लागणार आहे. टाळेबंदी नसली तरी कडक र्निबध लागू आहेत. औषध दुकाने व इतर अत्यावश्यक सेवा सुरू ठेवाव्या लागतील. यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. नागरिकांनी नियम काटेकोरपणे पाळावेत असेही आवाहन थोरात यांनी केले.

महापालिकेने आता नवीन पथके सर्वेक्षणासाठी नियुक्त केली आहेत. लक्षणे असणाऱ्या बाधितांना गृह विलगीकरणातून बाहेर काढून त्यांना कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. त्याला पदाधिकारी व नगरसेवकांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे, असेही थोरात म्हणाले.

आमदार व महापौरांशी चर्चा करणार

नगर शहरातील करोनाबाधितांची वाढती संख्या हा काळजीचा विषय आहे. प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांचे सहकार्य मिळवण्यासाठी आपण शहरातील विधानसभा व विधान परिषदेचे आमदार व महापौर यांच्या समवेत चर्चा करणार आहोत, त्यांचे सहकार्य मिळाले तर बाधितांची संख्या कमी होऊ शकते, असेही महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी नगरच्या भेटीत शहरातील बूथ रुग्णालयाला भेट देत कोविड सेंटरची माहिती घेतली. त्यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आदी उपस्थित होते.