अशोक तुपे

शेतकऱ्यांच्या शेतातून थेट मोठय़ा शहरातील ग्राहकांपर्यंत ऑनलाइन पद्धतीने फळे व भाजीपाला विक्रीचा प्रयोग सुमारे नऊ वर्षांपासून केला असला तरी त्याला मर्यादित यश मिळाले होते. करोना टाळेबंदी सुरू झाल्यानंतर आता ‘बास्केट कल्चर’ला मुंबई, पुणे, नाशिक आदी शहरांमध्ये प्रतिसाद मिळू लागला आहे. हजारो ग्राहक आता शेतकरी उत्पादक व खासगी कंपन्यांच्या माध्यमातून फळे-भाजीपाला खरेदी करू लागले असून बाजार समित्या, मंडई, आठवडे बाजार यांना एक पर्यायी व्यवस्था उभी राहिली आहे.

भाजीपाला व फळांची विक्री म्हणजे बाजार समित्या, मंडई, आठवडे बाजार, गुजरी, फेरीवाले एवढय़ापुरती मर्यादित राहिलेली नाही. २०१९ पासून इंटरनेटच्या माध्यमातून या क्षेत्रात ऑनलाइन खरेदीला प्रारंभ झाला. भाजीपाला मंडईत जाऊन पिशवीत खरेदी करण्याऐवजी तो आकर्षक बॉक्सच्या पॅकींगमध्ये मिळू लागला. वेबसाईट, अ‍ॅप, फोन कॉलच्या माध्यमातून ‘बिगबास्केट’चे पहिले स्टार्टअप आले. किराणा मालाबरोबर त्यांनी भाजीपालाही विकायला सुरुवात केली. विविध खासगी कंपन्यांमधील अनुभवाच्या जोरावर मारुती चापके यांनी ‘गो फॉर फ्रेश’च्या माध्यमातून फळे-भाजीपाल्याची बास्केट विक्री सुरू केली. आज त्यांची उलाढाल २५ कोटींहून अधिक असून आता देशभरात अनेक मोठय़ा शहरांमध्ये हा व्यवसाय त्यांनी सुरू केला आहे. त्याखेरीज अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, लिजाकार्ट, मोअर, नेचर बास्केट, ऑनलाइन ग्रोसरी, स्विगी आदी कंपन्याही त्यामध्ये उतरल्या. परंतु त्याला मर्यादित स्वरूपाचे यश मिळाले होते. करोनामुळे टाळेबंदी झाल्यानंतर पूर्वीच्या फळे व भाजीपाला विक्रीतील पारंपरिक व्यवस्था कोलमडून पडल्या. पुरवठा साखळीच विस्कळीत झाली. त्यामुळे एका नव्या व्यवस्थेचा उदय झाला.

बास्केट म्हणजे एका आकर्षक पुठ्ठय़ाच्या खोक्यात आठवडाभराचा भाजीपाला ग्राहकांना विशिष्ट रकमेला विकला जातो. बटाटे, मिरची, आले, लसून, कांदा, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, काकडी, गाजर, शेवगा तसेच मेथी, पालक, शेपू आदि सर्व प्रकारचा भाजीपाला दिला जातो. चार माणसांच्या कुटुंबाची आठवडाभराची गरज ओळखून आणि ग्राहकांच्या मागणीचा विचार करून भाजीपाल्याचे हे खोके तयार केले जाते. ते ठराविक किंमतीला विकले जाते. ऑनलाईन पद्धतीने मागणी नोंदविल्यानंतर सोसायटीत किंवा थेट सदनिकाधारकापर्यंत हा माल दिला जातो. पूर्वी अनेक सोसायटय़ा या पद्धतीला विरोध करत. आता मात्र टाळेबंदीत त्या सोसायटय़ांच्या अध्यक्षांनी ‘बास्केट’ विक्रेत्यांना निमंत्रणे दिली आहेत. नाशिक येथील सह्य़ाद्री कृषी शेतकरी उत्पादक कंपनी, प्रभात संचलित किसान कनेक्ट तसेच नगर जिल्ह्य़ातील दुधेश्वर, लोकपंचायत, श्रमविकास, राजमुद्रा आदींसह राज्यातील अनेक शेतकरी उत्पादक कंपन्या आता भाजीपाला व फळ बास्केटमध्ये उतरल्या आहेत.

मुंबई, नवी मुंबई ठाणे या शहरात अडीच कोटी ग्राहक असून त्यांना भाजीपाला व फळांची दैनंदिन गरज असते. सुमारे वीस हजार टन भाजीपाला दररोज त्यांना लागतो. त्यामुळे बास्केटचे फार मोठे मार्केट उपलब्ध आहे. ‘गो फॉर फ्रेश अ‍ॅग्रो’ या क्षेत्रात उतरले तेव्हा संकल्पना रुजायला सुरुवात झाली होती. आता टाळेबंदीमुळे ग्राहकांची ती गरज बनली. भविष्यात या क्षेत्रात मोठी संधी आहे, असे चापके यांनी सांगितले.

प्रभात उद्योग समूहाने या क्षेत्रात उतरण्याकरिता ‘किसान कनेक्ट’ ही शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली होती. नोव्हेंबरमध्येच सर्वेक्षण सुरू झाले होते. दुधाच्या वितरणाचा अनुभव होता. मुंबईतील सोसायटय़ांच्या अध्यक्षांची माहिती होती. टाळेबंदीत एप्रिलमध्ये काम सुरू केले. सहा प्रकारची बास्केट सध्या आहेत. फळे व भाजीपाला, फक्त भाजीपाला, फक्त फळे, फक्त आंबे, जैन भाजीपाला असे त्यांचे स्वरूप आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार त्याचा पुरवठा केला जातो. ग्राहकांचा त्याला मोठा प्रतिसाद आहे. सध्या पाचशे शेतकरी जोडले गेले आहेत, तर एक हजाराहून अधिक ग्राहकांपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. दोन-तीन महिन्यांतच ५० लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. सध्या दररोज १५ टन भाजीपाला पुरवला जातो, असे किसान कनेक्टचे संचालक उद्योगपती किशोर निर्मळ यांनी सांगितले.

संगमनेरच्या लोकपंचायतने मुंबईत सोसायटय़ांच्या माध्यमातून भाजीपाला विक्री सुरू केली आहे. तर दुधेश्वर शेतकरी कंपनी पुण्यातील वाघोली, विमाननगर, येरवडा भागात तर श्रमविकास कंपनी ही पुण्याच्या मध्यवर्ती भागात भाजीपाला पुरवठा करते, असे कृषी विभागाचे संगमनेरचे उपविभागीय अधिकारी सुधाकर बोराळे यांनी सांगितले. नगर जिल्ह्य़ात शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी अशा चार हजार लोकांनी अनेक मोठय़ा शहरात भाजीपाल्याची विक्री केली. पूर्वी सोसायटय़ांची दारे बंद होती. ती टाळेबंदीने उघडली. एक नवी व्यवस्था त्यामुळे विकसित होत असून आपत्तीतून संधी निर्माण झाली आहे.

दोन वर्षांपूर्वी ‘सह्य़ाद्री’ भाजीपाल्याच्या किरकोळ विक्री क्षेत्रात उतरले. पण आता ऑनलाइन विक्री पद्धतीत मुंबईतील ८५० सोसायटय़ांमध्ये थेट ८५ हजार ग्राहकांना भाजीपाला आणि फळे पुरविली आहेत. दोन लाख साठ हजार बास्केटमध्ये तीन हजार दोनशे टन भाजीपाला व फळे विकली. ग्राहकांचा प्रतिसाद मोठा होता. एक नवी बाजार व्यवस्था त्यानिमित्ताने उभी राहिली. त्यात सातत्य राहिले तर मोठी संधी आहे. गुणवत्ता, स्पर्धात्मक दर याला या क्षेत्रात महत्त्व आहे. आठवडे बाजार, मंडई, बाजार समित्या याला आता मर्यादा असून ई-कॉमर्सची व्यवस्था विकसित होत आहे. शेतकरी आणि ग्राहकांची ती गरज आहे. दोघांचेही त्यात हीत आहे. दर्जेदार भाजीपाला आणि फळे त्यांना रास्त दरात मिळतील. शेतकऱ्यांना थेट ग्राहकांपर्यंत माल विकता येईल. मध्यस्थ साखळीचा प्रभाव कमी होईल.

– विलास शिंदे, सह्य़ाद्री अ‍ॅग्रो