दिल्लीतील आंदोलनासाठी कोअर कमिटीची स्थापना

शेती उपकरणांवर आकारण्यात येणारा १८ टक्के जीएसटी हा शेतकऱ्यांवरील अन्याय असल्याचे सांगतानाच, साठ वर्षांवरील शेतकऱ्यांना पाच हजार रूपये पेन्शन सुरू झाली पाहिजे, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे शुक्रवारी यांनी पत्रकाद्वारे केली. येत्या २३ मार्च रोजी दिल्लीत होणाऱ्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची देश तसेच राज्य पातळीवर कोअर कमिटी तयार करण्याचा निर्णय १६ जानेवारी रोजी दिल्लीत झालेल्या विविध राज्यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आल्याचेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी उत्पादन खर्चावर आधारित ५० टक्के अधिक भाव शेती उत्पादनास मिळाला पाहिजे. शेतकरी वयाच्या साठाव्या वर्षांपर्यंत शेती उत्पादनासाठी आपले जीवन समर्पित करतो, शेतीचे कमी उत्पन्न मिळणाऱ्या तसेच घरातील एकही सदस्य नोकरीस नसल्याने शेतकऱ्यांना दुसरा आर्थिक सहारा नाही. साठीच्या पुढे आपले जीवन कसे व्यतित करायचे ही एकमात्र समस्या त्याच्यापुढे असते. घटनेनुसार शेतकऱ्यांना चांगले जीवन जगण्यासाठी किमान पाच हजार रूपये पेन्शन मिळाली पाहिजे. शेतकरी पेन्शन बिल संसदेत प्रलंबित आहे, त्यावर तत्काळ निर्णय होणे गरजेचे आहे. शेतकरी उत्पादन वाढविण्यासाठी नवनवीन तांत्रिक प्रयोग करतात. ठिबक सिंचन, तुषार सिंचनासाठींच्या उपकरणांवर शासनाकडून १८ टक्के जीएसटी आकारण्यात येतो, हा शेतकरी वर्गावर अन्याय आहे. देशातील शेतकरी व शेतमजूर या दोघांनाही उत्पादन सुरक्षा हमी मिळाली पाहिजे. अन्यथा शेतकऱ्यांना जीवन जगणे मुष्कील होईल. शेतकऱ्यांच्या पीक कर्जावर चक्रवाढ पद्धतीने व्याजाची आकारणी केली जाते, तेही योग्य नाही. १९४९ च्या बँक रेग्युलेशन कायद्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारणे बेकायदेशीर असल्याचे मत नोंदविले आहे. त्यासाठी ज्या बँका शेतक-यांच्या पीककर्जावर चक्रवाढ पद्धतीने व्याजाची आकारणी करतात, अशा बँकांवर कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे असे पत्रकात म्हंटले आहे .

येत्या महिनाभरात विविध राज्यांतील चारित्र्यशील कार्यकर्त्यांचा शोध घेण्यात येऊन प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र कोअर कमिटी स्थापन करण्यात येईल. कोअर कमिटीचे सदस्य लोकशिक्षण, लोकजागृती तसेच संघटनेचे काम करतील. प्रत्येक राज्यातील कोअर कमिटीचे  ५ ते ७ सदस्य देश पातळीवरील कोअर कमिटीमध्ये काम पाहतील. संपूर्ण देश कार्यक्षेत्र असलेल्या भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास या संस्थेच्या माध्यमातून विविध कोअर कमिटय़ा काम पाहतील. दिल्लीतील पंजाब बाग परिसरात संस्थेच्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध करण्यात आली असून आठवडाभरात हे कार्यालय सुरू होईल. ओरिसा, मध्यप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, आसाम, अरूणाचल प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आदी १६ राज्यात २३ मार्चच्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर हजारे यांच्या सभा झाल्या. त्या राज्यांतील कार्यकर्त्यांची दिल्ली येथे १६ जानेवारी रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती.