घटनास्थळी भेटी आणि आरोप-प्रत्यारोप

वसई :   विरारच्या विजयवल्लभ रुग्णालयात लागलेली आग विझल्यानंतर घटनास्थळी दाखल होऊ लागलेल्या राजकीय नेतेमंडळींनी आरोपांचा धुरळा उडवला. येथे दाखल झालेल्या भाजपच्या नेत्यांनी राज्य सरकारवर तर महाविकास आघाडीतील नेत्यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादासाहेब भुसे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष किरीट सोमय्या, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोळे, मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आदींचा समावेश होता. याशिवाय पालघरचे खासदार राजेंद्र गावित, आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर आदी घटनास्थळी उपस्थित होते.

या दुर्घटनेची निष्पक्ष तपासणी केली जाईल आणि जो कुणी दोषी आढळल्यास त्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे पालकमंत्री दादासाहेब भुसे यांनी सांगितले.  नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळीच राज्य शासनाच्या मदतीची घोषणा केली. चौकशीत कसलाही हलगर्जीपणा केला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष किरीट सोमया मुख्यमंत्र्यांनी अहंकार बाजूला ठेवून केंद्र सरकार आणि लष्कराकडे व्यवस्थापैकीय आणि वैद्यकीय सहकार्य मागावे अशी मागणी केली.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी याप्रकरणी ठाकरे सरकारला धारेवर धरत सर्व आता देवाच्या भरवशावर आहे, सरकारच्या नाही असे सांगितले.  ‘हा सरकारचा दोष आहे. भंडारा घटना असो, नाशिक घटना असो, भांडूप घटना असो, लोक व्यवस्थेच्या अपयशाने मरत आहेत,’ असे ते म्हणाले.  वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी ‘प्रशासनाने ज्या चुका आहेत, त्या कबूल केल्या पाहिजे आणि भविष्यात अशा दुर्घटना होणार नाहीत याची दखल घेतली पाहिजे. प्रशासनाने यंत्रणा अधिक  सक्षम केल्या पाहिजे,’ असे सांगितले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोळे यांनी या संपूर्ण घटनेबद्दल केंद्र शासनाच्या धोरणाला जबाबदार धरले.