राज्यातील १०३ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या घाऊक प्रमाणात बदल्या करताना सोलापूरचे पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांना अखेर हलविण्यात आले. त्यांची सुमारे तीन वर्षांची कालमर्यादा जवळपास संपत आली असताना त्यांच्या बदलीसाठी नागरिकांतूनच मागणी रेटली जात होती. त्यासाठी सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांना चक्क ‘मटका चिठ्ठय़ां’चा हार घालण्याचा इशारा काही सामाजिक संघटनांनी दिला होता. खुद्द पालकमंत्रीही पोलीस प्रशासनाच्या कारभारावर नाराजच होते. या पार्श्र्वभूमीवर पोलीस आयुक्त रासकर यांची अखेर बदली झाल्यामुळे पालकमंत्री अधिक समाधानी असल्याचे बोलले जाते.
रासकर यांची बदली पुण्यात अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून झाली असून त्यांच्या जागेवर नवे पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर हे पोलीस उपमहानिरीक्षकपदाच्या बढतीवर बदली होऊन येत आहेत. सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक दत्तात्रेय मंडलिक यांची अवघ्या अकरा महिन्यातच बदली झाली असून त्यांच्या ठिकाणी नवे पोलीस अधीक्षक म्हणून अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक वीरेंद्र प्रभू हे येत आहेत. याशिवाय सोलापूर ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी यांचीही अल्पावधीतच नांदेड येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पोलीस अधीक्षकपदावर बदली झाली आहे. तसेच शहर पोलीस आयुक्तालयात पोलीस उपायुक्त (परिमंडळ) सुभाष बुरसे यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनाही मुंबईत हलविण्यात आले आहे. सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मंडलिक यांना कवळ अकरा महिन्यांचाच अल्पसा कार्यकाळ लाभला. मंडलिक यांच्या अगोदर मकरंद रानडे हे सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक असताना त्यांना तडकाफडकी अवघ्या पाच महिन्यात हलविण्यात आले होते.
शहराचे पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांना सुमारे तीन वर्षांचा कार्यकाळ लाभला असून इतका कार्यकाळ मिळणारे ते बहुधा सोलापूरचे पहिले पोलीस आयुक्त मानले जातात. कायदा व सुव्यवस्था राखण्यात त्यांचे पोलीस प्रशासन यशस्वी ठरले नाही. उलट, गुन्हेगारीत वाढ झाल्याचे दिसून येते. यापूर्वी सोलापूर महापालिकेचे धडाकेबाज आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची बदली होण्यासाठी सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांनी जेवढा रस दाखविला होता, तेवढा ‘रस’ पोलीस आयुक्त रासकर यांच्या बदलीसाठी त्यांनी दाखविला नाही म्हणून ते टीकेचे धनी ठरले होते. वास्तविक पाहता पालकमंत्री देशमुख हे पोलीस आयुक्त रासकर यांच्या प्रशासनावर अजिबात समाधानी नव्हते. अखेर उशिरा का होईना रासकर यांची बदली होऊन नवे पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर हे रुजू होत आहेत. सेनगावकर हे पोलीस उपनमहानिरीक्षकपदाचा दर्जा घेत बढतीवर सोलापुरात येत आहेत.