सिंधुदुर्ग डंपर व्यावसायिकांनी सुरू केलेल्या चिघळलेल्या आंदोलनाची चौकशी कोकण आयुक्त तानाजी सत्रे यांनी जिल्ह्य़ात भेट घेऊन केली. त्यांनी शिवसेना-भाजपच्या नेत्यांना लेखी तक्रार द्या, कारवाई करतो असे निर्देश दिले. दरम्यान पालकमंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी अनिल भंडारी व पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असून त्यांची बदली व्हावी असे त्यांना वाटत नसल्याचे बोलले जात आहे.
जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या विरोधात सर्वपक्षीय आंदोलकांनी जोरदार टिका केली. शिवसेना-भाजपाचे नेतेदेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या दोन्ही अधिकाऱ्यांची उचलबांगडी करावी अशी मागणी केली, पण पालकमंत्री दीपक केसरकर यांनी या दोघानाही पाठीशी घातल्यानेच मुख्यमंत्र्यांनी कोकण आयुक्तांची एक सदस्यीय चौकशी समिती नेमल्याचे बोलले जात आहे.
सिंधुदुर्गनगरीत डंपर व्यावसायिक आंदोलन सुरू आहे. शिवसेना-भाजपने सोमवारी आंदोलनातून माघार घेतली. हे आंदोलन आता पक्षीय बनल्याने तसेच नारायण राणे आणि शिवसेना-भाजप श्रेयाचे राजकारण करत असल्याने मनसेनेदेखील माघार घेतली आहे. आता मनसेचा आंदोलनाला पाठिंबा नाही, असे मनसे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कोकण आयुक्त तानाजी सत्रे यांनी सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे येऊन डंपर व्यावसायिक आंदोलन, लाठीचार्ज, गौण खनिज व दंडात्मक कारवाईबाबत चौकशी केली. खासदार विनायक राऊत, भाजप प्रदेश चिटणीस राजन तेली शिष्टमंडळासह सत्रे यांना भेटले. त्यांनी झाला प्रकार सांगितला. प्रशासकीय यंत्रणेच्या तक्रारीचा पाढा वाचताना जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या विरोधातील तक्रारी लेखीस्वरूपात द्या असे कोकण आयुक्तांनी सांगितले.
भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी राणे कुटुंबीयांवर टीका केली. नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात एकतरी पोलीस केस अंगावर घेतली काय, असा प्रश्न उपस्थित करून राणेंसाठी आजपर्यंत शंभर केसीस अंगावर घेतल्याचे ते म्हणाले. राणे यांची सगळी कुंडली माझ्याजवळ आहे, त्यांनी टीका करताना भान ठेवावे, असे राजन तेली पत्रकार परिषदेत म्हणाले.
नारायण राणे यांना जिल्ह्य़ातील जनतेने पराभूत करून राजकारणातून निवृत्त केले आहे, असे शिवसेना जिल्हाप्रमुख आ. वैभव नाईक यांनी म्हटले आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन बिलोलीकर अतिदक्षता विभागात आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या निषेधार्थ डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध केला.