जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्पापासून असलेला गंभीर धोका लक्षात घेता असा प्रकल्प कशाला हवा, असा सवाल करत जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी या प्रकल्पाला सेनेचा असलेला विरोध पुन्हा एकवार अधोरेखित केला.
ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या वतीने चिपळूणजवळ गोवळकोट बेटावर आयोजित बॅकवॉटर फेस्टिवल व क्रोकोडाइल सफारीचा शुभारंभ वायकर यांच्या हस्ते रविवारी झाला. या वेळी खासदार हुसेन दलवाई यांनी उपस्थित
केलेल्या खाडीतील प्रदूषणाच्या मुद्दय़ाचा धागा पकडत पालकमंत्र्यांनी जैतापूर प्रकल्पाबाबत शिवसेनेची विरोधाची भूमिका कायम असल्याचे स्पष्ट केले.
या प्रकल्पाबाबत भाजप आणि सेना यांच्यात मतभेद असून, विशेषत: केंद्रात सत्तेवर आल्यापासून भाजपने प्रकल्पाचे सातत्याने समर्थन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रातील या प्रकल्पाशी संबंधित खात्यांच्या सर्व मंत्र्यांनी प्रकल्प अनिवार्य असल्याचे वेळोवेळी नमूद केले आहे. फ्रान्स आणि जपानबरोबर नागरी अणुऊर्जा सहकार्याबाबत पंतप्रधानांनी पुढाकार घेऊन करारही केले आहेत. दुसरीकडे सेनेच्या नेत्यांनी प्रकल्पविरोधाची भूमिका कायम ठेवली आहे. गेल्या १२ डिसेंबर रोजी जपानचे पंतप्रधान अ‍ॅबे यांच्या भारत दौऱ्याच्या काळात प्रकल्पविरोधकांनी केलेल्या जेल भरो आंदोलनात सेनेचे स्थानिक आमदार राजन साळवी हेही सहभागी झाले होते. त्यापाठोपाठ आता पालकमंत्री वायकर यांनी कोकणातील प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित होताच अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध नोंदवण्याची संधी साधली. त्यामुळे राज्यातील अन्य काही प्रमुख मुद्दय़ांवरील मतभेदांप्रमाणेच याही विषयावर भाजपा-सेना मतभेद कायम राहणार असल्याचे चित्र पुढे आले आहे.
दरम्यान या महोत्सवाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने बोलताना पालकमंत्र्यांनी, कोकणच्या १६७ किलोमीटर लांबीच्या समुद्रकिनाऱ्यांचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकास करण्याची गरज प्रतिपादन करत अशा पर्यटन स्थळांचे सुशोभिकरण व तेथपर्यंत जाण्यासाठी उत्तम रस्ते आणि निवास व्यवस्था आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. तसेच जिल्हय़ाच्या पर्यटन विकासासाठी ६७० कोटी रुपयांचा पर्यटन विकास आराखडा तयार करून पर्यटन विकासकामांसाठी टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून दिला जात असल्याचे सांगितले.
जिल्हय़ातील गड-किल्ल्यांच्या विकासासाठी प्रत्येकी १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
खासदार हुसेन दलवाई, आमदार सदानंद चव्हाण, नगराध्यक्ष सावित्री होमकळस, पर्यटन विकास महामंडळाचे सरव्यवस्थापक जगदीश चव्हाण इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.