पालकमंत्री सतेज पाटील हे भागीदार, संचालक असलेल्या पंचतारांकित सयाजी हॉटेल, डी. वाय. पी. मॉल या संकुलाची घरफाळा आकारणी बेकायदेशीर केली आहे. त्यांच्या ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्कचा घरफाळा १३ वर्षांपासून थकीत आहे. पालकमंत्र्यांनी महापालिकेतील सत्तेचा वापर करून सुमारे १५ कोटी रुपयांची आर्थिक लूट केली आहे, असा आरोप भाजपाचे नेते व माजी खासदार धनंजय महाडिक यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषदेत केला.

महाडिक म्हणाले, महापालिकेने घरफाळा, पाणीपट्टी दरवाढ प्रस्तावित केली आहे. पण दुसरीकडे महापालिकेतील धनदांडगे व राजकीय नेते यांच्या मिळकतींना घरपट्टी आकारणी केलेली नाही. महापालिका हद्दीतील २० हजार घरफाळा मिळकतींची अजिबात घरफाळा आकारणी केली जात नाही. यातील उदाहरण म्हणजे सतेज पाटील यांच्या सयाजी हॉटेल, डीवायपी हॉस्पिटॅलिटी येथे घरफाळा आकारणी करणाऱ्या आणि चौकशी करणाऱ्या यंत्रणेला नियंत्रित करून फाळा रक्कम कमी दाखवलेली आहे. त्यांच्या डीवायपी मॉल मध्ये ३० मोठ्या मिळकती आहेत. त्या स्वतः वापरतो असे त्याने दाखवून फाळा कमी लावला आहे.

तसेच, त्यांच्या ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क या मिळकतीचा फाळा १९९७ पासून १ कोटी थकीत आहे. सुमारे १५ कोटी रुपयांची आर्थिक लूट याद्वारे पालकमंत्री पाटील यांनी केली आहे. याची चौकशी महापालिकेने करावी अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल. घरफाळा लुटणाऱ्या लोकांमुळे महापालिकेच्या आर्थिक तिजोरीला भगदाड पडले आहे. त्यामुळे नागरिकांनी घरफाळा भरून नये, असे आवाहनही महाडिक यांनी केले. यावेळी, ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम, माजी महापौर सुनील कदम उपस्थित होते.

सतेज पाटील यांचे समर्थकांचा पलटवार  –

तर दुसरीकडे, माजी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे बोलायला ठोस मुद्दा नसल्यानेच जुनेच तुणतुणे वाजवत आहेत. आदर्श भीमा वस्त्रम, कृष्णा सेलिब्रेटी यासारख्या त्यांच्या इमारतीत बेकायदेशीर गोष्टी करणाऱ्या महाडिक यांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, असा पलटवार कॉंग्रेसचे गट नेते शारंगधर देशमुख यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. महापौर निलोफर आजरेकर, सचिन चव्हाण उपस्थित होते.

महाडिक यांनी आरोप केल्यावर पालकमंत्री सतेज पाटील यांचे समर्थक समर्थन करण्यासाठी पुढे आले. देशमुख म्हणाले, माजी आमदार महादेवराव महाडिक व माजी खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर महानगरपालिकेसाठी किती निधी दिला यावर बोलावे. महाडिक गटांने हॉटेल सयाजीबाबत यापूर्वी केलेले वक्तव्य माजी खासदारांनी महापालिकेच्या पार्श्वभुमीवर केले आहेत. हॉटेल सयाजीच्या माध्यमातून दोन हजार रोजगाराची निर्मिती झाली आहे. महाडिकांनी स्वतः असा प्रकल्प उभा करून किती रोजगार कोल्हापुरात निर्माण केले हे ही जनतेला सांगावे.

महाडिक उत्तरे द्या –

कृष्णा सेलिब्रेटी इमारतीमधील वाहनतळात दुकांन गाळे बांधून विकून आपण महापालिकेची फसवणूक केली आहे. भीमा एज्युकेशन सोसायटी, पेट्रोल पंप, हॉस्टेल, घोडे तबेला याचा महाडिक यांनी थकीत घरफाळा का भरलेला नाही? आदर्श भीमा वस्त्रम या इमारतीच्या वाहनतळावर आपण व्यवसाय करता, त्याचे काय? ते अध्यक्ष असलेल्या पंढरपूर येथील भीमा कारखान्याने कामगारांचा २१ महिन्यांचा पगार, २० महिन्यांचा प्रॉव्हिडंट फंड, निवृत्त कर्मचाऱ्यांचे ७ कोटी रुपये, ८० लाखांचे वाहतूक बिल, हंगामी कर्मचाऱ्यांचा चार वर्षांपासूनचा बेकार भत्ता, चालू हंगामातील ऊस बिले दिलेली नाहीत. ही देणी येत्या आठ दिवसात दिली नाहीत तर कारखान्याच्या दारात उपोषण करतील, असा इशारा देण्यात आला.