शहरातील सीना नदीत सोडल्या जाणा-या मैलामिश्रित सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प त्वरित उभारावा, त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करा, सबबी सांगू नका, लवकरच विधानसभेची आचारसंहिता लागेल, त्यापूर्वी सर्वसाधारण सभा घेऊन विषय मार्गी लावा, अशी तंबी पालकमंत्री मधुकर पिचड यांनी महापालिका आयुक्त विजय कुलकर्णी यांना दिली.
जिल्हा नियोजन समितीची सभा काल पिचड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. नगर शहरातील सांडपाणी प्रक्रिया न करताच सीना नदीत सोडले जाते. त्यामुळे नगर तालुक्यातील १७ गावे व कर्जत तालुक्यातील काही गावे तसेच थेट सीना धरणातील पाणीही त्यामुळे प्रदूषित होऊ लागले आहे. त्यातून लोकांचे आरोग्य व शेतीही धोक्यात आली आहे. समितीच्या गेल्या तीन-चार सभांतून हा विषय चर्चिला जात आहे. मनपाच्या या कारभाराविरोधात जिल्हा परिषदेनेही न्यायालयात धाव घेतली आहे.
आमदार बबनराव पाचपुते व जि.प. सदस्य बाळासाहेब हराळ यांनी पुन्हा या विषयाकडे लक्ष वेधले. त्यावर आयुक्तांनी केंद्र सरकारने यासाठी २६६ कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर केला आहे, ठेकेदार नियुक्ती व इतर बाबींसाठी लवकरच हा विषय महासभेपुढे ठेवला जाईल, प्रथम प्रक्रिया करण्याचे काम सुरू केले जाईल, त्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने १७ एकर जागा ताब्यात दिली आहे, त्यामुळे नदी प्रदूषित होण्याचा प्रकार तातडीने थांबेल, अशी माहिती ते देत होते. मात्र खासदार दिलीप गांधी यांनी त्यात हस्तक्षेप करत त्यांना थांबवले व मनपाच्या सभा वेळेवर होत नाहीत, मनपाला चांगले ठेकेदार मिळत नाहीत, अशी परिस्थिती असताना आचारसंहितेपूर्वी काम कसे मार्गी लावणार, असा प्रश्न केला.
ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये विधानसभेची आचारसंहिता लागेल, त्यापूर्वी महासभा घेऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करा, अशी सूचना पिचड यांनी केली. येत्या महासभेपुढे हा विषय ठेवण्याचे आयुक्तांनी मान्य केले.