प्रबोध देशपांडे 
अकोला : करोना संकटाचे काळे ढग अधिक गडद होत असतांना वाशीम जिल्हा वाऱ्यावर आहे. पालकत्वाच्या जबाबदारीपासून राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सोयीस्कर दुरावा ठेवला. मागील साडेचार महिन्यापासून पालकमंत्री वाशीम जिल्ह्याकडे फिरकले देखील नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतप्त भावना निर्माण झाली आहे.

वाशीम जिल्ह्यात सुरुवातीच्या काळात नियंत्रणात असलेला करोना गत काही दिवसांमध्ये वेगाने हातपाय पसरतो आहे. विशेषत: जिल्ह्यातील ग्रामीण भागात संसर्ग वेगाने वाढत आहे. टाळेबंदीत शिथिलता दिल्यानंतर मुंबई, दिल्लीसह इतर ठिकाणावरून वाशीम जिल्ह्यात दाखल झालेल्यांना करोनाची बाधा झाल्याचे आढळून येत आहेत. परिणामी, करोनाबाधितांची रुग्ण संख्या वाढून अर्धशतकीय टप्पा पार केला. जिल्ह्यात दोन जणांचा बळी देखील गेला आहे. करोना संकटाशी वाशीम जिल्हावासी दोन हात करीत असतांना पालकमंत्री शंभूराज देसाई मात्र गत साडेचार महिन्यापासून जिल्ह्यात आलेच नाहीत.

२५ जानेवारीला नियोजन समिती बैठक व २६ जानेवारीला ध्वजारोहणासाठी ते आले होते. त्यानंतर त्यांनी वाशीम जिल्ह्याकडे पाठ फिरवली. करोनासारखे गंभीर संकट आल्यावरही त्यांनी वाशीम जिल्ह्यात येण्याचे टाळले. त्यांच्या गृह जिल्ह्यापासून वाशीमचे अंतर ५०० कि.मी.पेक्षा जास्त असल्याने रस्ते मार्गाने येण्यात जास्त वेळ लागू शकतो. त्यामुळे प्रत्यक्षात जिल्ह्यात दाखल होण्याऐवजी पालकमंत्र्यांनी दूरचित्रसंवाद माध्यमातून आठ ते दहा वेळा जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्कात राहून त्यांनी सूचनाही दिल्या. करोना संकटामध्ये मात्र प्रत्यक्षात त्यांनी वाशीम जिल्हा दौरा केला नसल्याने जनतेमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

करोना आपत्तीतच खरीप हंगाम दाखल झाला. शेतकºयांना असंख्य समस्यांचा सामना करावा लागत आहे. पेरणी तोंडावर आली असतांना शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही. वाशीम जिल्ह्यात २५ टक्क्यांच्या आतच पीक कर्ज वाटप झाले असून, शेतकºयांना बँकांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. खरीप हंगाम, पीक कर्ज वाटप, बी-बियाण्यांची उपलब्धता आदींचेही नियोजन करण्यासाठी पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष आढावा घेणे अपेक्षित असते. मात्र, पालकमंत्री जिल्ह्यात येतच नसल्याने अनेक गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. पालकमंत्र्यांनी स्वत: जिल्ह्यात दाखल होऊन जनतेचा धीर व प्रशासनाचे मनोबल वाढविण्याची गरज व्यक्त होत आहे.

अकोला व वाशीम जिल्ह्याचे दुर्दैवच
महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात अकोला आणि वाशीम जिल्ह्याला स्थानच मिळाले नाही. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील पालकमंत्री पदाची धुरा बाहेर जिल्ह्यातील मंत्र्यांच्या खांद्याावर आली. नेत्यांना आपला मतदारसंघ व जिल्हासोडून इतर जिल्ह्याविषयी तेवढी आत्मियता व तळमळ नसते. त्याचा प्रत्यय अकोला व वाशीम जिल्ह्याला आला. दोन्ही जिल्ह्यातील परिस्थिती अधिक बिकट होत चालली आहे.

“वाशीम जिल्ह्यात दाखल होण्यासाठी अनेक जिल्ह्यातील लाल क्षेत्रातून एवढा लांबचा रस्ता प्रवास जातो. परिणामी, करोनाचा संसर्ग पसरण्याचा धोका अधिक वाढू शकतो. त्यामुळे दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून वारंवार आढावा घेऊन परिस्थिती नियंत्रणात ठेवली. जिल्ह्यातील दैनंदिन परिस्थितीवर लक्ष ठेवले असून, अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. लवकरच प्रत्यक्षात जिल्ह्याचा दौरा करणार आहे.
– शंभूराज देसाई, पालकमंत्री, वाशीम.
महाविकास आघाडीचे गोंधळलेले सरकार आहे. जिल्ह्यात करोनाची रुग्ण वाढ होत असून, शेतकरी, कामगार यांचे अनेक प्रश्न आहेत. पीक कर्जाचे वाटप होत नसल्याची स्थिती आहे. पालकमंत्र्यांनी निश्चिातपणे जिल्ह्याचा दौरा करायला पाहिजे. केवळ दूरचित्रसंवादातून जिल्ह्यातील प्रश्न सुटणार नाहीत.
-आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाध्यक्ष, भाजप, वाशीम.