सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची बदली झाल्यानंतर योगायोगाने सोलापुरात मुक्कामी असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुडेवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर काही तासांतच शासनाकडून गुडेवार यांना तातडीने पदभार सोडण्याचे आदेश प्राप्त झाले. भागवत यांच्या भेटीचा हा परिणाम असावा, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
गुडेवारांची बदली होताच कोठे यांना काँग्रेस ‘प्रिय’!
शुक्रवारी सकाळी आयुक्त गुडेवार यांना मुंबईत मंत्रालयातून आलेल्या आदेशानुसार त्यांनी आपला पदभार जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे सोपवला. धडाकेबाज प्रशासन चालवत असताना अवघ्या अकरा महिन्यांतच पालिकेचे आयुक्त गुडेवार यांची अचानकपणे बदली झाल्याने त्याविरोधात जनतेत तीव्र संताप व्यक्त होत असून याच प्रश्नावर काल गुरुवारी ‘सोलापूर बंद’ पाळण्यात आला होता.
गुडेवारांच्या बदलीसाठी शासनाने घेतला त्यांच्याच अर्जाचा आधार
बदलीनंतर गुडेवार हे लगेचच पदभार न सोडता पालिकेतील प्रलंबित फायलींवर निर्णय घेण्याचे कामकाज पाहात होते. त्याचबरोबर त्यांचा जनसंपर्कही सुरूच होता. त्यांची बदली रद्द व्हावी म्हणून काही हितचिंतक मंडळी प्रयत्नशील होती, तर काही जण न्यायालयात धाव घेण्याची तयारी करीत होते. दरम्यान, मावळते आयुक्त गुडेवार यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना महापालिकेत रस्ते कामाशी संबंधित फायलीवर सही केल्यामुळे पालिकेची सुमारे ५० कोटींची बचत झाली. परंतु त्याच वेळी आपली बदली होणार, याची जाणीवही झाली. मात्र बदलीपेक्षा पालिकेचे हित पाहणे कर्तव्य समजल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यांचे हे भाष्य सत्ताधा-यांना झोंबले असावे. त्यातच योगायोगाने काल गुरुवारी सायंकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे विजापूर जिल्ह्य़ातील निंबाळ येथे गुरुदेव रानडे आश्रमास भेट देऊन पुढे गुजरातकडे रवाना होण्यापूर्वी सोलापुरात काही वेळ मुक्कामाला होते. याच दरम्यान, संघाच्या स्थानिक पदाधिका-यांनी भागवत यांना पालिका आयुक्त गुडेवार यांच्याविषयीची माहिती दिली आणि भागवत यांनीही गुडेवार यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार उभयतांची भेट घडवून आणण्यात आली. मात्र त्यानंतर काही तासांतच मंत्रालयातून गुडेवार यांना तातडीने पदभार सोडण्याचे आदेश आले.