सांगली, मिरजेत शनिवारी गुढीपाडव्यानिमित्त ढोल ताशांच्या गजरात मिरवणुका काढून नववर्षांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. पाडव्याच्या मुहुर्तावर शहरात सोने, दुचाकी आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदी-विक्रीत कोटय़वधीची उलाढाल झाली.
    गुढी पाडव्यानिमित्त मिरज शहरात मदान दत्त मंदिरापासून शोभा यात्रा काढण्यात आली. लक्ष्मी मार्केट, सराफ कट्टा माग्रे ही शोभायात्रा काढण्यात आली. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ या यात्रेची सांगता करण्यात आली. यात्रेत सजविलेले घोडे, पालखी यांचा समावेश होता. नगरसेविका मकरंद देशपांडे, पांडुरंग कोरे, ओंकार शुक्ल, गजानन कुल्लोळ्ळी, राजेश िशदे, राजाभाउ देसाई, राजीव बेडेकर आदीसह  शेकडो कार्यकत्रे सहभागी झाले होते.
    सांगली शहरात नेमिनाथनगर येथून शोभायात्रा काढण्यात आली. यात्रेत सजविलेल्या ट्रॅक्टरमध्ये शाळकरी मुले इतिहास पुरुषांच्या वेषात सहभागी झाली होती. महिला वर्गही भगवे फेटे परिधान करून मिरवणुकीत अग्रभागी होता. ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या या शोभायात्रेची सांगता विश्रामबागमधील गणेशमंदिरानजिक करण्यात आली.
    सांगलीतील सुंदरनगर या वेश्या वसाहतीत गुढीपाडव्यानिमित्त अंधश्रध्दा निर्मूलनाची शपथ महिलांनी घेतली. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती बंदवा आणि सचिव दीपक चव्हाण यांनी पत्रकार अशोक घोरपडे यांच्यासोबत महिलांना अंधश्रध्दा निर्मूलनाची शपथ दिली. मिरजेच्या महाराणा प्रताप चौकात दलित महासंघाच्यावतीने पारधी समाजाचे पूनर्वसन करण्यात शासनाला आलेल्या अपयशाच्या निषेधार्थ काळी गुढी उभी करून निषेध करण्यात आला.
आबांच्या गावात पाडवा नाही
    तासगाव तालुक्यातील माजी उपमुख्यमंत्री आर. आर. तथा आबा पाटील यांच्या गावात अंजनी येथे आज गुढी उभी करण्यात आली नाही. आबांच्या अकाली मृत्यूमुळे गावात गुढी उभी न करण्याचा निर्णय गावच्या आमसभेत घेण्यात आला होता. अंजनीत होळीही यंदा साजरी करण्यात आली नव्हती. आता पाडवाही साजरा करण्यात आला नाही.
कोटय़वधीची उलाढाल
    सांगलीच्या सराफी पेठेत शनिवारी पाडव्याच्या मुहुर्तावर सोने खरेदीसाठी रात्री उशिरापर्यंत लोकांची गर्दी होती. पु.ना. गाडगीळ सराफी पेढीवर आज सोन्याचा दर प्रति तोळा २६ हजार ५०० रुपये असल्याचे सांगण्यात आले. दुकानात सुवर्णालंकारापेक्षा सोन्याचे वेढण म्हणजेच चोख सोने खरेदीकडे ग्राहकांचा ओढा जास्त असल्याचे गाडगीळ सराफी पेढीतून सांगण्यात आले. तसेच शहरात दुचाकी खरेदीतही मोठय़ा प्रमाणात उलाढाल झाली. फ्रीज, वातानुकूल यंत्रे, एलईडी खरेदीसाठी इलेक्ट्रॉनिक दुकानात दुपारपासून गर्दी होती. कोटय़वधी रुपयांची उलाढाल आज पाडव्याच्या मुहुर्तावर झाली.