साडेतीन मुहूर्तापकी एक असलेला गुढीपाडव्याचा सण शुक्रवारी जिल्हय़ात मोठय़ा उत्साही आणि मंगलमय वातावरणात साजरा झाला. जिल्ह्य़ात ठिकठिकाणी शोभायात्रा काढून नववर्षांचे स्वागत करण्यात आले. शिवाय या यात्रेच्या माध्यमातून सामाजिक जागृतीही करण्यात आली.
अलिबाग शहरात हिंदू नववर्ष स्वागतयात्रा समितीच्या वतीने स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने शहरात ठिकठिकाणी गुढय़ा आणि स्वागतकमानी उभारल्याने मंगलमय वातावरण तयार झाले होते. अलिबाग शहरात काढण्यात आलेल्या शोभायात्रेत खगोलविषयक, कर्तृत्ववान महिला, दत्त जन्म प्रसंग या विषयावरचे चित्ररथ असणार आहेत. घोडागाडी, घोडेस्वार, विविध बँड पथके होती. अलिबागच्या युवक-युवती-महिलांचा सहभाग असलेलं ढोल पथक साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५व्या जयंती वर्षांनिमित्त त्यांचे भव्य चित्र असलेले रथ हे या स्वागतयात्रेचे वैशिष्टय़ होते.
स्वागतयात्रेत स्त्री-पुरुष पारंपरिक वेशात आणि डोक्यावर भगवे फेटे बांधून आणि हातात भगवे झेंडे घेऊन सहभागी झाले होते. पारंपरिक वाद्यांबरोबरच या वेळी ढोलपथकांचा सहभाग हे आकर्षण ठरले. विविध सार्वजनिक मंडळे तसेच व्यायामशाळांची पथकेही या यात्रेत सहभागी झाली होती. यात्रेच्या मार्गावर तरुणांनी तसेच लहान मुलांनी वेगवेगळी प्रात्यक्षिके सादर करून वाहवा मिळवली. विविध समाज प्रबोधनपर चित्ररथ या यात्रेत सहभागी झाले होते. महिला फुगडय़ा घालून नवीन वर्षांचे स्वागत करताना आनंद व्यक्त करीत होत्या. या वेळी रघुजी आंग्रे, प्रा. उदय जोशी, उदय शेवडे, नगरसेविका वृषाली ठोसर, आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सुरेश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, भाजपा युवा मोर्चा रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, डॉ. मेधा घाटे आदी या स्वागतयात्रेत सहभागी झाले होते. रायगड जिल्ह्य़ात अलिबागसह रेवदंडा, चौल, महाड, कर्जत, रोहा, पेण या ठिकाणी नववर्ष स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
गुढीपाडव्याचा सण घरोघरी मंगलमय वातावरणात साजरा झाला. नववस्त्राची गुढी उभारून दारावर तोरण लावण्यात आले होते. सुवासिनींनी गुढीची पूजा केली. सर्वानी एकमेकांना नवीन वर्षांच्या शुभेच्छा देत कडुिनब व गूळ वाटण्यात आला. घरोघरी पुरणपोळी व श्रीखंडपुरी असा गोडाचा बेत होता.
झेंडूच्या फुलांचा बाजार तेजीत होता. झेंडू १०० ते १५० रुपये किलोने विकला जात होता. खरेदीसाठी बाजारात गर्दी होती. पाडव्याचा शुभमुहूर्त साधत सोने, दुचाकी, चारचाकी वाहने तसेच गृहोपयोगी वस्तूंची मोठय़ा प्रमाणात खरेदी झाली. अनेकांनी नवीन दुकानांचे उद्घाटन, गृहप्रवेश करीत मुहूर्त साधला.