गेल्या चार महिन्यांत शहापूर तालुक्यातील ५०० जनावरे विषबाधेने मृत झाल्याचे वृत्त दै. ‘लोकसत्ता’मध्ये झळकल्यानंतर निद्रावस्थेतील शासकीय यंत्रणा झपाटय़ाने कामाला लागली आहे. अधिक पशुबळी जाऊ नयेत यासाठी चिल्हारवाडी आणि परिसरात पशुसंवर्धन विभागामार्फत एक कॅम्प सुरू केला असून, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याबरोबरच पाण्याचा हौद बांधणे, क्षारयुक्त चाटण विटा मागविणे, असे विविध उपाय सुरू करण्यात येणार आहेत.
जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. जे. एम. डोईफोडे, जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अरविंद गंधे, शहापूरचे तहसीलदार सुनील भुताळे यांनी चिल्हारवाडी येथे भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या पशुधनावर अधिक गदा येऊ नये यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत जनावरांचे लसीकरण करणे, चाऱ्यावर चुन्याची निवळी फवारणे असे विविध उपाय राबविले जात आहेत. याशिवाय चिल्हारवाडी व परिसरात पाणीटंचाई असल्याने विहिरीजवळ हौद बांधून पाण्याची व्यवस्था करणे तसेच बंधारा बांधणे, पाणी संचय तलाव बांधण्याची कामे रोजगार हमी योजनेतून करण्याचे आदेश तहसीलदारांनी संबंधित विभागाला दिले आहेत.
मृत जनावरांची हाडे चघळणे, कुजलेले अन्न खाणे अशा प्रकारचे अखाद्य खाद्य खाल्ल्याने ऑक्झलेट विषबाधा होऊन जनावरे लुळी पडतात व एक-दोन दिवसांत मृत्युमुखी पडत असल्याचे प्राथमिक निदान करण्यात आले आहे. या भागात चरणाऱ्या जनावरांनी कुजलेले, सडलेले खाद्य व मृत जनावरांची हाडे चघळू नये यासाठी पालघर येथून ४०० क्षारयुक्त चाटण विटा मागविण्यात येणार असून, त्या भागातील प्रत्येक शेतकऱ्याला येत्या दोन दिवसांत प्रत्येकी एक वीट देण्यात येणार आहे. ही वीट जनावरांनी चाटल्यानंतर त्यांना क्षार मिळतील, अशी माहिती शहापूर पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. ए. पी. पाटील यांनी दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 29, 2013 2:54 am