बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले भाजप खासदार डॉ. के. सी. पटेल यांनी बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेवरच पलटवार केला आहे. माझ्याविरोधात हनी ट्रॅपचा षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला असून पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. संबंधीत महिलेला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

वलसाडचे खासदार डॉ. के. सी पटेल यांनी ३ मार्चला निवासस्थानी बोलावून बलात्कार केल्याचा आरोप एका महिलेने केला होता. या आरोपानंतर दिल्लीतील न्यायालयाने पटेल यांच्याविरोधात आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिल्ली पोलिसांना दिले होते. या प्रकरणाची वाच्यता केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी पटेल यांनी दिल्याचे या महिलेचे म्हणणे होते.

महिलेच्या आरोपांवर के सी पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्याविरोधात हनी ट्रॅपचा षडयंत्र रचण्यात आला असून मला या प्रकरणात नाहक गोवण्यात आले असे पटेल यांनी म्हटले आहे. ‘संबंधित महिलेने अंमली पदार्थ देऊन शुद्धीत नसताना आपत्तीजनक व्हिडिओ तयार केला,’ असा आरोप त्यांनी सोमवारी केला होता. पटेल यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तक्रारदार महिलेविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३८४ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मंगळवारी सकाळी पोलिसांनी तक्रारदार महिलेला चौकशीसाठी गाझियाबादमधील घरातून ताब्यात घेतले. चौकशीनंतर पोलिसांनी महिलेला अटक केली असून तिला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, पीडित महिलेच्या आरोपानुसार के.सी पटेल यांनी कायदेशीर सल्ला घेण्याच्या बहाण्याने घरी बोलावले होते. घरात एक मोलकरीणही होती. जेवणानंतर मोलकरीण घराबाहेर निघून गेली आणि मग पटेल यांनी बलात्कार केला असे पीडितेचे म्हणणे होते. तर पटेल यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. संबंधित महिलेने ५ कोटींची मागणी केली होती. मात्र मी पैसे देण्यास नकार दिल्याने माझ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी महिलेने दिल्याचे पटेल यांचे म्हणणे होते.