शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याच्या निर्णयाचा पुनरुच्चार केला. लोकसभा आणि विधानसभेची आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याच्या निर्णयापासून आम्ही मागे हटणार नाही. आता धनुष्यातून बाण सुटलाय, त्यामुळे माघार घेण्याचा प्रश्नच येत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते शुक्रवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. गुजरात विधानसभा निवडणूक हा ट्रेलर होता, तर गुरुवारी जाहीर झालेले राजस्थानमधील पोटनिवडणुकांचे निकाल हा इंटरव्हल होता. आता २०१९ मध्ये खरा चित्रपट पाहायला मिळेल, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

यावेळी संजय राऊत यांनी मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावरही ताशेरे ओढले. जेटलींनी सादर केलेला अर्थसंकल्प फक्त कागदावरच खूप चांगला वाटतोय. सध्या देशभरात शेतकरी आत्महत्या करत आहेत. सध्यातरी अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीविषयी इतक्या लवकर निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही, असे राऊत यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या मुंबईत झालेल्या बैठकीत २०१९ ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा ठराव मंजूर झाला होता. यानंतर शिवसेना नेत्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. ‘बरे झाले, एकदाची स्पष्टता आली,’ अशी बहुतांशांची भावना असली तरी जमिनीवरील घडामोडींची कल्पना नसलेल्या राज्यसभेतील मंडळींच्या सांगण्यावरून इतक्या घाईघाईने निर्णय घेण्याची गरज नव्हती, असेही बहुतकांचे म्हणणे आहे.

२०१४ साली केंद्रात सत्तेत आल्यापासून शिवसेना आणि भाजपामध्ये अगदी सुरुवातीपासूनच कुरबुरी सुरु झाल्या होत्या. केंद्रात मंत्रीपद मिळण्यावरुन दोन्ही पक्षांतील वाद विकोपाला पोहोचला होता. त्यानंतर राज्यात मोठा भाऊ आणि लहान भाऊ कोण? यावरून दोन्ही पक्ष समोरासमोर उभे ठाकले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निवडणुकीत भाजपाने १२२ जागांवर विजय मिळवत शिवसेनेचा पराभव केला होता. त्यावेळी बहुमताचा आकडा गाठण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला पाठिंबा द्यायची तयारी दर्शवली होती. त्यामुळे शिवसेनेने नाईलाजाने फडणवीस सरकारला पाठिंबा देऊ केला होता. मात्र, नंतरच्या काळातही दोन्ही पक्षातील दरी सातत्याने वाढत गेली.